धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला असून, राज्यभर आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. धनगर समाजाचे नेते आणि आंदोलक दीपक बोराडे यांनी सरकारविरोधात पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून, आता पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलनाची धग पोहोचली आहे. आगामी काळात मुंबईत मोठे आंदोलन उभारण्याची तयारी धनगर समाजाकडून केली जात आहे. त्यामुळे मुंबईत पिवळे वादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी 1 डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथे महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा केवळ शक्तिप्रदर्शन नसून सरकारला इशारा देण्यासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे दीपक बोराडे यांनी स्पष्ट केले आहे. या मेळाव्यातून धनगर समाज मुंबईला कधी धडकणार, याची तारीख जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 1 डिसेंबरच्या मेळाव्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आठ दशकांपासून आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत आरक्षणाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या आठ दशकांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, विविध सरकारांनी आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्षात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखोंच्या सभेत धनगर आरक्षणाचा अभ्यास झाला असून, भाजपला सत्ता दिल्यास आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले होते, असा दावा दीपक बोराडे यांनी केला. धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजपचे सरकार आले, असे देवेंद्र फडणवीस अनेकदा सांगत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, सत्तेत आल्यानंतरही धनगर समाजाला दिलेला शब्द पाळण्यात आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या योगदानाची जाणीव ठेवली नाही, अशी टीका बोराडे यांनी केली. सरकारने समाजाच्या भावनांशी खेळण्याचे काम केले असून, आता केवळ आश्वासनांवर समाज समाधानी राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. 17 सप्टेंबर 2025 पासून आरक्षणाचा लढा सुरू धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाड्यातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आल्याचे दीपक बोराडे यांनी सांगितले. त्यानंतर हा लढा टप्प्याटप्प्याने राज्यातील विविध भागांत पोहोचवण्यात येत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातही आरक्षणाच्या मागणीसाठी जनजागृती आणि संघटनात्मक बांधणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 12 वर्षांपासून भाजप सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजाच्या आरक्षणाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जात असून, त्यामुळे धनगर बांधवांमध्ये नाराजी वाढत आहे. आता मोठ्या संघर्षासाठी समाजातील बांधवांना तयार करण्याचे काम सुरू असल्याचे बोराडे म्हणाले. आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 1 डिसेंबरला अहिल्यानगरमध्ये महाएल्गार; मुंबई आंदोलनाची तारीख ठरणार धनगर समाजाच्या आंदोलनातील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1 डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथे होणारा महाएल्गार मेळावा. या मेळाव्याला राज्यातील विविध भागांतील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सरकारला इशारा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दीपक बोराडे यांनी सांगितले. या मेळाव्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची तारीख याच मेळाव्यात जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील मेळाव्यानंतर धनगर समाजाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे. सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात येत आहे. मराठा आरक्षणानंतर धनगर समाजही आक्रमक; सरकारची डोकेदुखी वाढणार? दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीवर सरकारला 90 दिवसांचा कालावधी दिला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर आरक्षणाचे दोन महत्त्वाचे प्रश्न पुन्हा एकदा उभे राहण्याची शक्यता आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि दुसरीकडे धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी, यामुळे सरकारची राजकीय आणि प्रशासकीय कोंडी होऊ शकते. 1 डिसेंबर रोजी अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या महाएल्गार मेळाव्यातून धनगर समाज पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहे. त्यानंतर मुंबईत आंदोलनाची घोषणा झाल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा… ‘महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही, मात्र संघर्ष टाळा’:उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला; इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकाराचे समर्थन राजकारणात प्रत्येकाची काही ना काही महत्त्वाकांक्षा असते. ती बाळगण्यात किंवा निवडणूक लढविण्यात गैर काय? मात्र, या महत्त्वाकांक्षेचे रूपांतर आपापसांतील संघर्षात होता कामा नये, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या स्थानिक राजकीय वादांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी सावध राजकीय अंतर राखले. सविस्तर वाचा…. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 7 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ‘महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही, मात्र संघर्ष टाळा’:उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला; इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकाराचे समर्थन सुशील कराडवर विनयभंगाचा गुन्हा दाखल:महिलेचे गंभीर आरोप, परळी पोलिसांवर विश्वास नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी