शैक्षणिक सहलीतून ‘प्रत्यक्ष शिक्षणा’चा अनुभव:किड्झी प्री स्कूलतर्फे आयोजन; भाजी, फळ बाजार, गोशाळा, पोलिस ठाण्यात भेट
![]()
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारे शिक्षण देण्याच्या उद्देशाने येथील किडझी प्री स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वार्षिक शैक्षणिक सहल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ‘प्रत्यक्ष शिक्षणा’चा अनोखा आणि समृद्ध अनुभव घेता आला. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना शहरातील भाजी बाजार, फळ बाजार, गोशाळा तसेच पोलिस ठाण्याला भेट देण्यात आली. भाजी व फळ बाजारात मुलांनी विविध भाज्या आणि फळांची ओळख करुन घेतली. विक्रेते, ग्राहक आणि व्यवहाराच्या पद्धतीची माहिती घेताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गोशाळेला दिलेल्या भेटीत मुलांनी गायींची देखभाल, त्यांचे महत्त्व आणि प्राण्यांप्रती जिव्हाळ्याबाबत माहिती जाणून घेतली. या अनुभवामुळे त्यांच्या मनात प्राण्यांप्रती प्रेम, संवेदनशीलता वाढीस लागली. दरम्यान, ‘कम्युनिटी हेल्पर्स’ची ओळख करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याची भेट घडवली. येथे ठाणेदार अजित जाधव यांनी उपस्थित राहून मुलांशी संवाद साधला. पोलिसांचे दैनंदिन कामकाज, समाजातील त्यांची भूमिका व जबाबदाऱ्यांबाबत त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. मुलांनीही उत्सुकतेने प्रश्न विचारत या भेटीचा आनंद घेतला. बौद्धिक, सामाजिक विकासास मदत या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे ॲड. अविन अग्रवाल यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण सहलीचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका चंचल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक पियुष भोजगढिया, नितेश अग्रवाल आणि सुमित वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या सहलीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंदाचे भाव झळकले.
