कळसुबाई शिखरावर मूलभूत सुविधा, वनसंवर्धनासाठी उपाययोजना कराव्या:कळसुबाई मित्र मंडळाची वनमंत्री नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
![]()
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवरील महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर भाविक व पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कळसुबाई मित्रमंडळाने केली आहे. या संदर्भात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. वनमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे सांगितले. कळसुबाई शिखर हे धार्मिक, नैसर्गिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ असून, दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात. मात्र, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छतेमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कळसुबाई परिसरात नियमित कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा उभारावी व प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध लावावेत. भाविकांसाठी सावली शेड, स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी; तसेच सूचना फलक लावावेत. कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग परिसरात वनौषधी व फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी. कळसुबाई मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचे सुशोभिकरण करावे. बारीगाव मार्गे असलेल्या जीर्ण लोखंडी शिड्या बदलून दुहेरी (ये-जा) व्यवस्था तातडीने उभारावी. इंदोरे गावातून माकड कड्यावरून जाणारा प्राचीन मार्ग पुन्हा सुरू करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी अनिल भोपे, कैलास कडू, प्रवीन भटाटे, महेंद्र आडोळे, विकास शेंडगे, नीलेश पवार आदी उपस्थित होते.
