दिंडोरी रोहयो कार्यालयाच्या छताला भगदाड; जीव मुठीत धरून कामकाज:छताचे प्लास्टर कोसळत असल्याने कर्मचारी, नागरिकांत भीती; दुरूस्तीची मागणी
.

दिंडोरी तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना (रोहयो) विभागाची इमारत अत्यंत जर्जर झाली असून, छताचे प्लास्टरला भगदाड पडले आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. इमारतीची पडझड सुरू असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कार्यालयाच्या छताचे सिलिंग अनेक ठिकाणी निखळले असून, पावसाळ्यात पाणी गळतीमुळे महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणक संच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील हजारो मजुरांचे मस्टर्स, पगार आणि नवीन कामांचे नियोजन याच कार्यालयातून चालते. मात्र, जागेअभावी बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. इमारतीचे खांब कमकुवत झाले असून, भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे कर्मचारी सतत भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातून मजूर आणि ग्रामस्थ आपल्या तक्रारी किंवा कामांच्या मंजुरीसाठी या कार्यालयात येतात. इमारतीच्या धोकादायक अवस्थेमुळे कार्यालयात थांबणेही त्यांना असुरक्षित वाटते. विशेषतः पावसाळ्यात येथील परिस्थिती अधिकच गंभीर होते. प्रशासनाकडून या इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन जागेत स्थलांतर करण्याबाबत ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. एखादी मोठी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. या महत्त्वाच्या विभागासाठी तातडीने सुरक्षित इमारत उपलब्ध करून द्यावी किंवा सध्याच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शासनाकडून मजुरांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात, मात्र ज्या कार्यालयातून या योजनांचे नियोजन होते, त्याच कार्यालयाची अशी अवस्था असणे दुर्दैवी आहे. या कार्यालयाची दुरुस्ती करावी आणि तुटलेल्या फरशा बदलून द्याव्यात. – आप्पा वाटणे, तालुका सेक्रेटरी माकप
नवीन तहसील कार्यालय अंतिम टप्प्यात असून, त्या ठिकाणी फर्निचरचे काम सुरु आहे. या ठिकाणी खर्च करता येत नाही. रोजगार हमी योजनेच्या कार्यालयासाठी दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली जाईल. – मुकेश कांबळे, तहसीलदार दिंडोरी
