थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सायबर फसवणूक:बनावट खाते बनवून केली पैशांची मागणी; सायबर सेलकडे तक्रार दाखल

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-25t175244420_1779711825.jpg




वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर विभाग नागरिकांना यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग व्यवहारांबाबत सातत्याने सतर्क करत आहे. मात्र, तरीही डिजिटल अरेस्ट आणि सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून भावनिक मेसेजद्वारे पैशांची मागणी करण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. यात आता सर्वसामान्यांसह उच्चपदस्थ अधिकारीही सायबर भामट्यांचे लक्ष्य होत असून, नुकतेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून व्हिएतनाम व थायलंडमधून बनावट सोशल मीडिया खाते तयार करत नागरिकांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या बनावट सोशल मीडिया खात्यावरून काही व्यक्तींकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर, त्यांनी स्वतः सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांकडे अशी कोणतीही आर्थिक मागणी केली जात नाही. त्यामुळे या बनावट खात्यावरून येणाऱ्या संदेशांना नागरिकांनी बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये आणि अशा कोणत्याही संशयास्पद प्रकारांची त्वरित माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. या बनावट व्हॉट्सअॅप खात्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, छायाचित्र आणि “Collector District Magistrate” असे पदनाम वापरून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सायबर भामट्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. साताऱ्यात आंतरराष्ट्रीय टोळीला अटक दरम्यान, साताऱ्यातील सायबर विभागाने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला गजाआड करत त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आणि रोकड जप्त करण्याची मोठी कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच, आता थेट जिल्हाधिकाऱ्यांचेच बनावट सोशल मीडिया खाते तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed