बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’ची जाहिरात केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. याप्रकरणी आता एक मोठी माहिती समोर आली असून, या तिन्ही अभिनेत्यांनी जाहिरात करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज ही माहिती दिली असून, यामुळे या कलाकारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, जाहिरात आणि दाव्यांबाबत आपण तीन अभिनेत्यांना जी नोटीस पाठवली होती, त्याबाबत आपण त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे. हे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ज्यांनी याबाबतची नोटीस पाठवली होती, त्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत आपले निरीक्षण नोंदवले आहे. या अभिनेत्यांनी जाहिरात करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती मुंढे यांनी दिली आहे. त्यामुळे आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे दिसून येत आहे. पुढे बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांना आहे, अशा सहआयुक्तांना हे प्रकरण देण्यात येणार असून पुढील आठवड्यापर्यंत हे प्रकरण त्यांच्याकडे जाईल. त्यानंतर सहआयुक्तांसमोर या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच या प्रकरणी अभिनेते अजय देवगण यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून याचिका दाखल केल्याची माहिती देखील मुंढे यांनी दिली आहे. दरम्यान, या तीनही अभिनेत्यांवर जाहिरातींमध्ये उत्पादनाचे कथित चुकीचे सादरीकरण केल्याचा आरोप आहे. FDA कडून ऑगस्ट महिन्यात अभिनेत्यांना नोटीस ‘विमल इलायची’ची जाहिरात वरकरणी केवळ वेलचीची असल्याचे भासवत असली, तरी या ब्रँडचा थेट संबंध पान मसाल्याशी आहे. राज्यात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे कायदेशीर बंदी असल्याने, अशा प्रकारच्या जाहिराती (सरोगेट जाहिराती) करण्यावरही कडक निर्बंध आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात या अभिनेत्यांना नोटीस बजावली होती आणि या निर्बंधांची त्यांना स्पष्ट जाणीव करून दिली होती. नोटीसमध्ये काय म्हटले आहे? एफडीएने बजावलेल्या या नोटिशीमध्ये ‘विमल पान मसाला आणि इलायची’च्या जाहिरातींमधील सहभाग आणि समर्थन तत्काळ थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच, अभिनेत्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरून या जाहिराती व प्रचारात्मक मजकूर हटवावा आणि भविष्यात अशा उत्पादनांच्या प्रचारासाठी कोणतेही सहकार्य करू नये, असेही बजावण्यात आले होते. याशिवाय, ‘विमल इलायची’ हे स्वतंत्र उत्पादन आहे की ‘विमल पान मसाला आणि तंबाखू’चीच ती सरोगेट (ब्रँड विस्तार) जाहिरात आहे, याबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही या नोटिशीत देण्यात आले होते. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. कालबाह्य अन्नपदार्थ रिपॅक करून बाजारात!:एफडीएची धडक कारवाई, 5 कोटींचा साठा जप्त; तुकाराम मुंढेंनी नवीन ऑर्डरच काढली कालबाह्य (एक्सपायर) आणि खराब झालेले अन्नपदार्थ नष्ट केल्याचे कागदोपत्री दाखवून, त्याच पदार्थांचे पुन्हा पॅकेजिंग करून त्यांची बाजारात सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महाराष्ट्रासाठी आता स्वतंत्र आदेश काढला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या धडक मोहिमेअंतर्गत गेल्या काही दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search