पदवीधर मतदारांनी दाखवलेला विश्वास ही केवळ विजयाची पावती नसून मोठी जबाबदारी आहे. पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगार तरुणांच्या अडचणी, शिक्षणातील समस्या आणि प्रलंबित मागण्यांना विधान परिषदेत प्राधान्य देणार आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी दिली. पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आ. देशमुख यांचे प्रथमच सातारा जिल्ह्यात आगमन झाले. त्यानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आपल्या विजयाचे श्रेय महाविकास आघाडीच्या एकजुटीला देताना देशमुख म्हणाल्या, निवडणुकीत आघाडीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचाराचे प्रभावी नियोजन करून संपूर्ण यंत्रणा ताकदीने राबवली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये राहावे लागते. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या खर्चामुळे अनेक विद्यार्थ्यांना हा खर्च पेलवणे कठीण होत आहे. याबाबत विचारले असता, विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असून, एनआयईएसच्या पोर्टलमधील तांत्रिक अडचणी आणि संथ कारभार सुधारण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी निवडणुकीतील यश हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फलित असल्याचे सांगितले. सत्कार समारंभास माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, समीर घाटगे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search