नांदेडमध्ये दीड-दोन हजार अवैध पिस्तूल:गुन्हेगारांना 'राजाश्रय' देऊ नका!, सरकारी रुग्णालयात पोलिसांसमोर हत्या होतेच कशी? हेमंत पाटलांचा सवाल
![]()
गेली 3 ते 4 दिवसांमध्ये नांदेडमध्ये ज्या खुनाच्या घटना घडल्या आहेत त्या अत्यंत वाईट आहेत. नांदेड शहरामध्ये अवैध हत्यारे आली आहेत. नांदेडमधील अनेक गुन्हेगार हे गुन्हे करतात आणि तेलंगणा किंवा कर्नाटकात पळून जातात, असे शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. नांदेडमध्ये गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही असे म्हणत पाटील यांनी गृहविभागाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड शहरात जर झडती घेतली गेली तर अवैध दीड ते 2 हजार पिस्तूल सापडतील. त्यामुळे कोणाचाच वचक शहरावर राहिलेला नाही. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. त्यांना व्याजाने पैसे दिले जातात, त्यांचे लॅपटॉप आणि इतर वस्तु हिसकावल्या जातात. यामुळे नांदेडमध्ये पोलिस आयुक्तालय झाले पाहिजे. पोलिसांच्या सिंघम अशा प्रतिमा रंगावल्या जातात पण ते केवळ तोडपाणी करण्यात पुढे असतात, असा आरोप पाटील यांनी केला आहे. गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये हेमंत पाटील म्हणाले की, मुलींची छेडछाड, बलात्कार, चोरी असे गुन्हे दाखल असणाऱ्यांना कोणीही राजाश्रय देऊ नये. मध्यतंरी शहरातील व्यापाऱ्यांकडून शेकडो कोटी रुपयांच्या खंडण्या जमा उकळण्यात आल्या. त्यामुळे अनेक व्यापारी शहर सोडून गेले. सर्व पक्षीय लोकांनी गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये. सरकारी रुग्णालयात पोलिसांसमोर जर हत्या होत असेल तर असे पोलिस दल काय कामाचे. जे पोलिस तिथे उपस्थित होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे. कागदावर काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी हेमंत पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या 23 कोटी रुपये निधी परत जातो याला कोण जबाबदार आहे. मोठे अधिकारी छोट्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवतात. त्याचा तपास झाला पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणात निधी आला तर तो कामासाठी असतो केवळ कागदावर कामे होत असतील तर कारवाई झाली पाहिजे.
