ST Bus Fare Increase | एसटी प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात महागाईचा चटका; 15 एप्रिलपासून नवे दर लागू
ST Bus Fare Increase | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. ऐन गर्दीच्या हंगामात एसटी बसच्या भाड्यात १० टक्क्यांनी हंगामी भाडेवाढ (Seasonal Fare Hike) करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. ही नवीन भाडेवाढ १५ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या तोंडावर दरवाढीचा निर्णय
या निर्णयामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असून प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत मुलांच्या शाळेला सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबे गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर पडतात. या काळात एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत महामंडळाने भाडेवाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनतेला आता प्रवासासाठीही जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
एसटी महामंडळाच्या या निर्णयावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून समाजमाध्यमांवर आणि प्रत्यक्ष प्रवासातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “एकीकडे महिलांना अर्ध्या तिकीट दराची सवलत दिली जाते आणि दुसरीकडे सर्वांवरच भाडेवाढ लादली जाते, हे धोरण चुकीचे आहे,” असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले. श्रीमंत लोक एसटीने प्रवास करत नाहीत, त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका केवळ गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांनाच बसणार आहे. तिकिटाचे दर वाढवण्याऐवजी ते कमी करून गरिबांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
