पार्थ पवारांच्या मदतीला NCP ची फौज:काँग्रेसवर पलटवार करत काढला राहुल गांधींच्या कर्तृत्वाचा मुद्दा; जशास तसे प्रत्युत्तर देणार
![]()
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून खासदार पार्थ पवार यांच्यावर कृतघ्न मुलगा म्हणत जहरी टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसवर जोरदार पलटवार करत काँग्रेसला दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले नेते राहुल गांधींच्या कामगिरीकडे पाहण्याचा टोला हाणला आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. पार्थ पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधताना राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. विशेषतः शरद पवारांनीही त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवारांना काँग्रेसचे मोठेपण लक्षात आणून देत आपण स्वतः व पार्थ यांचे वडील अजित पवारही काँग्रेसच्या मुशीत तयार झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी पार्थ पवारांवर होणारी टीका फेटाळताना राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद दिला सूरज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद देण्याचे काम केले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची जनभावना आहे. पण या जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेस ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसच्या या भूमिकेचा दाखला देत पार्थ पवारांनी काँग्रेसचे डाऊनफॉल सुरू होईल असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यांवर पुन्हा अशी टीका केली तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काँग्रेसने काय केली होती पार्थ पवारांवर टीका? महाराष्ट्र काँग्रेसने पार्थ पवारांवर टीका करताना त्यांचा उल्लेख कृतघ्न मुलगा असा केला होता. काँग्रेसने म्हटले होते, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रगेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे, असे काँग्रेसने म्हटले आहे. शेवटी पाहू काय म्हणाले होते पार्थ पवार? तत्पूर्वी, पार्थ पवार काँग्रेसवर निशाणा साधताना म्हणाले होते, माझे कुणाशीही बोलणे झाले नाही. पण काँग्रेसला कळायला पाहिजे काय करायचे ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही. सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहिती आहे काय सुरू आहे. त्यांनी विचार केला असेल, तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल. लोक विसरत नाहीत. जे दादांचे प्रेम आहे लोकांच्या मनात, अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटते की, आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असे पार्थ पवार म्हणाले होते.
