MHADA Lottery 2026 | म्हाडाच्या घरासाठी कोण अर्ज करू शकतं? पाहा संपूर्ण माहिती
MHADA Lottery 2026 | मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचं घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरांच्या प्रचंड किमतीमुळे सर्वसामान्यांसाठी हे स्वप्न पूर्ण करणे कठीण ठरते. त्यामुळेच Maharashtra Housing and Area Development Authority म्हणजेच म्हाडा वेळोवेळी परवडणाऱ्या दरात घरांची लॉटरी जाहीर करत असते. आता मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून इच्छुक नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
या लॉटरीसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रतेच्या अटी काय आहेत, कोण अर्ज करू शकतो आणि कोणाला अर्ज करता येणार नाही, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अटींचे पालन न केल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय अर्ज सादर करण्याच्या दिवशी किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार, त्याची पत्नी किंवा पती आणि अल्पवयीन मुले यांच्या नावावर बृहमुंबई महापालिका हद्दीत आधीपासून घर, फ्लॅट किंवा निवासी भूखंड नसावा. जर अशा प्रकारची मालमत्ता आधीपासून असेल तर त्या व्यक्तीला या लॉटरीसाठी अर्ज करता येणार नाही.
याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला आधीच केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेतून घर मिळाले असेल, तर त्या व्यक्तीस किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत घर मिळण्यास पात्रता राहणार नाही.
MHADA Lottery 2026 | अधिवास आणि उत्पन्नाच्या अटी :
अर्जदाराकडे महाराष्ट्रातील अधिवास (Domicile) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या 20 वर्षांच्या कालावधीत किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य केले असल्याचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून मिळालेले असावे. हे अधिवास प्रमाणपत्र जानेवारी 2018 नंतरचे आणि बारकोड असलेले असणे आवश्यक आहे.
तसेच अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारावर ठरवले जाईल. उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र किंवा तहसिलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. पती-पत्नी दोघांचे उत्पन्न असल्यास दोघांचेही उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
महत्त्वाच्या तारखा :
मुंबईतील MHADA लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 एप्रिल 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अनामत रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहे.
सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी 5 मे 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर हरकती आणि दावे दाखल करण्यासाठी 8 मेपर्यंत मुदत दिली जाईल. अंतिम यादी 12 मे रोजी जाहीर होणार असून या लॉटरीची सोडत 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे.
