बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न:दत्तात्रय भरणे लक्ष्मण हाकेंच्या भेटीला; सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार
![]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवार, 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. मंत्री दत्तात्रय भरणे हे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना भरणे म्हणाले, मी सुनेत्रा पवार यांच्या वतीने हाके सरांना भेटायला आलो आहे. शेवटी ही जागा अपघाताने पोटनिवडणूक आहे. आपण ही जागा सुनेत्रा वहिनींना सहकार्य करावे, सुनेत्रा वहिनींसाठी माघार घ्यावी ही विनंती करण्यासाठी मी आलो आहे. पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, माझी आज पहिलीच भेट आहे. त्यांना मी 3-4 वर्षांपूर्वी भेटलो आहे. शेवटी ही निवडणूक बारामतीची आहे. बारामतीसाठी अजितदादांनी खूप काही केले आहे. राज्यासाठी केले आहे. आपल्या नेत्याला जर श्रद्धांजली वाहायची असेल तर हाके सरांना विनंती करणार आहे की उमेवारी मागे घ्यावी. तसेच मी कॉंग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना देखील भेटणार आहे. त्यांच्यासाठी अजितदादांनी काय केले आहे हे त्यांनाही माहिती आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी कन्हेरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे- रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसे झाले नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असे समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन करतो! तुमचे एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..!, अशी भावनिक साद रोहित पवारांनी घातली आहे.
