‘मन्नत: हर खुशी पाने की’ हा टीव्ही शो नवी कथा आणि नव्या प्रमुख कलाकारांसह परतत आहे. तन्वी डोगरा मन्नत जुनेजा, तर नमिक पॉल कबीर ओबेरॉयची भूमिका साकारताना दिसणार आहेत. मन्नत स्वावलंबी, निर्भिड आणि कुटुंबावर खूप प्रेम करणारी मुलगी आहे. ती आपला भाऊ विराटच्या नावाने ढाबा चालवते. दुसरीकडे, कबीर हा यशस्वी व्यावसायिक आहे, ज्याच्यासाठी पैसा, सत्ता आणि प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे. कबीर मन्नतचा ढाबा पाडण्यासाठी पोहोचतो, तेव्हा दोघांमध्ये संघर्ष सुरू होतो. मात्र, भूतकाळाशी संबंधित गुपिते आणि भावनिक नातेही त्यांची कथा विशेष बनवतील. शोची नवी सुरुवात, पडद्यावरील केमिस्ट्री, सोशल मीडिया आणि खासगी आयुष्याशी संबंधित मुद्द्यांवर तन्वी डोगरा आणि नमिक पॉल यांनी संवाद साधला. प्रश्न: ‘मन्नत’ची नवी कथा आणि नव्या प्रमुख कलाकारांसह शो एका नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे. प्रेक्षकांना या नव्या जोडीमध्ये असे काय पाहायला मिळेल, जे तिला आधीपेक्षा वेगळे बनवेल? उत्तर/तन्वी डोगरा: आमच्यातील समीकरण खूप वेगळे आहे. कबीर खूप चिडका आणि अहंकारी आहे. तो मन्नतशी विशेषतः उद्धटपणे वागतो. दोघांमधील खटके पाहायला मिळतील. आमच्या व्यक्तिरेखांची पार्श्वभूमीही वेगळी आहे. नमिक पॉल: दोघांमध्ये भावनिक नाते आणि अपराधीपणाची भावना आहे, जी त्यांच्या आयुष्यावर आणि निर्णयांवर परिणाम करते. हे अपराधीपण नेमके काय आहे आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यात कसा बदल होतो, याचा खुलासा शोमध्ये होईल. प्रश्न: मन्नत आपल्या भाऊ विराटच्या नावावर ढाबा चालवते आणि कबीरसमोर ठामपणे उभी राहते. या व्यक्तिरेखेतील कोणती गोष्ट तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडलेली वाटते? उत्तर/तन्वी डोगरा: मला वाटते की मन्नतचा आत्मविश्वास माझ्या व्यक्तिमत्त्वाशी जुळतो. आपण जे करत आहोत, ते योग्य आणि नैतिक आहे, याची तिला खात्री आहे. ती आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवते आणि कठीण परिस्थितीतही मागे हटत नाही. प्रश्न: कबीर ओबेरॉय हा एक यशस्वी व्यावसायिक आहे, जो मन्नतचा ढाबा पाडण्यासाठी येतो. कबीरला वाटते का की पैसा आणि सत्तेच्या जोरावर सर्व काही मिळवता येते, की मन्नत त्याच्यात बदल घडवून आणणार आहे? उत्तर/नमिक पॉल: कबीरला वाटते की पैशाने कोणतीही गोष्ट विकत घेता आणि नियंत्रित करता येते. त्याच्यासाठी नियंत्रण महत्त्वाचे आहे आणि त्यामागे त्याचा भूतकाळ आहे. मन्नत त्याच्यात बदल घडवून आणू शकेल की नाही, हे शोमध्ये कळेल; पण त्याला बदलणे सोपे नसेल. प्रश्न: प्रोमोमध्ये मन्नत आणि कबीरची टक्कर रंजक वाटत आहे. खऱ्या आयुष्यात तुमच्यापैकी जास्त रागीट कोण आहे आणि शूटिंगदरम्यान सर्वाधिक नोकझोक कोणाची होते? उत्तर/तन्वी डोगरा: आम्ही आतापर्यंत एपिसोडसाठी एकत्र जास्त शूटिंग केलेले नाही. पण नमिक मला शांत आणि संयमी वाटतात. ते खूप गोड आणि साधे आहेत. नमिक पॉल: तन्वीही खूप आनंदी स्वभावाच्या आहेत. त्या सतत हसत असतात आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. आमची एकत्र शूटिंग नुकतीच सुरू झाली आहे, त्यामुळे खऱ्या नोकझोकीबद्दल काही सांगणे घाईचे ठरेल. प्रश्न: तुम्ही दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहात. पहिली भेट कशी झाली? पहिल्याच नजरेत एकमेकांसोबत काम करण्याचा सहजपणा जाणवला का? जवाब/तन्वी डोगरा: जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले, तेव्हा नमिक क्रिएटिव्ह टीमसोबत उभे होते. मला पाहून ते म्हणाले की, त्यांना सांगण्यात आले होते की नायिका उंच आहे. नमिकला पाहून मी गंमतीने म्हणाले की, त्यांना तर नायक उंच आहे असे सांगितले होते, पण इथे तर काही वेगळेच प्रकरण आहे. नमिक पॉल: लूक टेस्टदरम्यान आमची पहिली भेट झाली होती. त्या दिवशी आम्ही एक मॉक सीन केला आणि त्याच रात्री मला प्रवासाला निघायचे होते. टीमने या सीनवर खूप मेहनत घेतली होती आणि तो चांगला झाला. तन्वीला भेटणे हा एक चांगला अनुभव होता. प्रश्न: आजकाल टीव्ही कलाकारांची लोकप्रियता केवळ टीआरपीवरूनच नाही, तर इन्स्टाग्राम रील्स, फॅन एडिट्स आणि व्हायरल क्लिप्सवरूनही मोजली जाते. सोशल मीडियावर तुमची आणि तन्वीची केमिस्ट्री दाखवणारे फॅन एडिट्स तुम्ही पाहता का? कधी एखाद्या चाहत्याच्या प्रतिक्रियेने तुम्हाला आश्चर्यचकित केले आहे का? उत्तर/नमिक पॉल: चाहते आमच्यासाठी काहीतरी तयार करतात, तेव्हा खूप छान वाटतं. काही जण चित्रं काढतात, फोटो एकत्र जोडतात आणि पोर्ट्रेट्स तयार करतात. हे पाहून छान वाटतं की लोक त्यासाठी इतका वेळ आणि मेहनत घेतात. मात्र, या गोष्टींवरून मी लोकप्रियता मोजत नाही. माझ्यासाठी हे चाहत्यांकडून मिळालेला एक गोड भाव आहे. प्रश्न: टीव्ही इंडस्ट्रीतील दीर्घ शूटिंग शेड्यूल्स आणि सतत बदलणाऱ्या कथांदरम्यान स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आणि मानसिक शांतता कशी सांभाळता? शूटिंगचा ताण कधी घरापर्यंत पोहोचतो का? उत्तर/तन्वी डोगरा: मी आनंदी स्वभावाची व्यक्ती आहे. मला फारसा राग येत नाही आणि छोट्या-छोट्या गोष्टींचे ओझे मी मनावर घेत नाही. माझे असे मानणे आहे की शांततेने आणि एकमेकांशी मिळून काम केले पाहिजे. हीच ऊर्जा मी घरातून सेटवर आणि सेटवरून घरी घेऊन जाते. नमिक पॉल: माझ्यासाठी काम करणे हीच आनंदाची गोष्ट आहे. मला शूटिंग आणि सीन्स करायला आवडतात. अनेकदा गंमतीने म्हणतो की माझे दुसरे आयुष्यच नाही. रिकामे बसण्यापेक्षा काम करावे आणि काहीतरी चांगले व विधायक करावे. प्रश्न: आज टीव्ही इंडस्ट्रीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाचा दबाव वाढला आहे. तुम्हाला असे वाटते का की कलाकारांना चांगल्या अभिनयासोबतच आपल्या डिजिटल प्रतिमेवरही तितकीच मेहनत घ्यावी लागते? उत्तर/तन्वी डोगरा: नक्कीच. आज डिजिटल विश्व प्रभावशाली झाले आहे. मोबाईल फोन सतत आपल्या जवळ असतो आणि कलाकार सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कलाकारांनी सोशल मीडियावरही काम केले पाहिजे. नमिक पॉल: सोशल मीडिया महत्त्वाचे आहे, असे मला वाटते; पण फोटो काढून ते पोस्ट करण्याचा मला आळस येतो. मात्र, आता मी अधिक पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही त्याकडे लक्ष देईन. प्रश्न: तुम्हाला तुमच्या मन्नत किंवा कबीर या व्यक्तिरेखांना खऱ्या आयुष्यातील अनुभवांवरून काही सल्ला द्यायचा असेल, तर तुम्ही काय सांगाल? तसेच, शोच्या नव्या सुरुवातीसाठी प्रेक्षकांना काय आवाहन करू इच्छिता? उत्तर/तन्वी डोगरा: मी मन्नतला सांगेन की तिने स्वप्ने पाहत राहावे आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करत राहावी. जर विराटच्या ढाब्याला जगातील सर्वोत्कृष्ट ढाबा बनवणे हे तिचे स्वप्न असेल, तर ते पूर्ण करण्याच्या दिशेने तिने पुढे जात राहावे. नमिक पॉल: मी कबीरला सांगेन की त्याने शांत राहावे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू नये.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search