राहुरीच्या पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर:फडणवीसांचा फोन अन् विखे-चव्हाणांची भेट, अखेरच्या क्षणी प्राजक्त तनपुरेंची माघार; कारणही सांगितले
![]()
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीत अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रबळ दावेदार मानले जाणारे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत, राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारणही सांगितले. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून प्राजक्त तनपुरे शड्डू ठोकणार, अशी जोरदार चर्चा होती. तनपुरे यांनी या निवडणुकीसाठी मोठी तयारीही केली होती, ज्यामुळे राहुरीत चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी सर्वांची धारणा होती. फडणवीसांचा फोन आणि तनपुरेंची माघार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला काही अवधी उरला असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड खलबते झाली. विशेष म्हणजे, या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोनवरून तनपुरे यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर आणि भाजप नेत्यांच्या शिष्टाईनंतर तनपुरे यांनी आपला पवित्रा बदलला आणि निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केले. प्राजक्त तनपुरेंनी फेसबुकवरील पत्रात काय म्हटले? निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पत्र पोस्ट करत, निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारण सांगितले. प्राजक्त तनपुरे पत्रात लिहिले की, “आपल्या राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून मी या विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. याच जाणिवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नांसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि मला समाधान आहे की त्या सर्व मुद्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या.” प्राजक्त तनपुरे म्हणाले, “जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला, तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा अजिबात अर्थ नाही. आपण दोन पावले मागे घेतली आहेत. पण आता त्यानंतर चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे. राहुरीच्या विकासाची, आपल्या हक्काची ही लढाई अशीच सुरू राहील अधिक ताकदीने, अधिक निर्धाराने.” प्राजक्त तनपुरे म्हणाले, “या संपूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय, हितचिंतक आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, आणि तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. यापुढील काळात देखील आपण असेच प्रेम द्याल व माझ्या पाठीशी उभे रहाल हा विश्वास आहे.”
