दुष्काळात प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. पाण्याचे दुर्भिक्ष होऊ शकते हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात असले पाहिजे. आपण पाणी कमी वापरल्याने काय फरक पडणार हा प्रश्न पहिले मनातून काढून टाकणे आवश्यक आहे. घरातील गळणारे नळ त्वरित दुरुस्त करावेत. दात घासताना, दाढी करताना किंवा भांडी घासताना नळ सतत सुरू ठेवू नये. आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करावा. वाहन धुण्यासाठी पाइपऐवजी बादली वापरावी. भाजी धुण्यासाठी वापरलेले  पाणी झाडांना वापरता येईल. घरातील पाण्याच्या टाकीला स्वयंचलित नियंत्रण किंवा ओव्हरफ्लो रोखण्याची व्यवस्था करावी.

पिण्यासाठी पाण्याला प्राधान्य

 पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी प्राधान्याने राखून ठेवावे. उपलब्ध पाण्याचा वापर पिणे, स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर कामांसाठी आवश्यकतेनुसार विभागून करावा. पिण्याचे पाणी स्वच्छ, झाकलेल्या भांड्यात साठवावे. पाणीटंचाई असताना पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये.

सार्वजनिक पुरवठ्यांवर नजर ठेवणे

 गावांमध्ये सार्वजनिक नळांवरील गळती थांबवणे, पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे पालन करणे आणि पाण्याचे समान वाटप सुनिश्चित करणे, ओलीतासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे, शेततळी, नालाबांध, बंधारे आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपाययोजना स्थानिक परिस्थितीनुसार राबवाव्यात. रोजगार हमीच्या कामांतून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासनाशी समन्वय साधावा.पुढील पावसाळयात भूजल पुनर्भरण करता यावे, यासाठी आवश्यक कामांचे नियेाज आजपासून करावे. त्यासाठी बंधारे, छोटे बांध,नाला खोलीकरण रुंदीकरण असे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.  मराठवाड्यातील प्रत्येक घरावर टीन असो वा कवेलू त्यावरील पाणी जमिनीत मुरेल याचे नियोजन करण्याची सूचना देखील हा दुष्काळ करतो आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आता प्रत्येक घरासाठी अनिवार्य स्वतः करणे महत्त्वाचे ठरते. भूजल पुनर्भरणासाठी  या छोट्या उपाययोजना अधिक आवश्यक ठरतात.

दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होतो

आपली सर्व अर्थव्यवस्था ही शेतीवर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था उत्पादनावरून अवलंबून असते. त्यामुळे दुष्काळ पडू शकतो हे गृहीत धरून उपलब्ध पाणी, जमिनीतील ओलावा, पीकस्थिती आणि संभाव्य उत्पन्न यांचा हिशेब करणे गरजेचे आहे. पुढील पेरणीपूर्वी कृषी विभागाच्या सल्ल्याने कमी पाण्यात येणारी, स्थानिक हवामानाला  अनुरूप पिके निवडावीत. पाणी उपलब्ध नसताना जास्त पाणी लागणाऱ्या पिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी संभाव्य नुकसानाचा विचार करावा. शक्य असेल तेथे ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनातून पाणी थेट पिकांच्या मुळांजवळ पोहोचते. सिंचनासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी योग्य वेळ निवडावी आणि शेतातील पाइप, व्हॉल्व्ह व जोडण्यांमधील गळती थांबवावी. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी पिकांचे अवशेष किंवा योग्य आच्छादन वापरावे. गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळावे.

माती परीक्षण ; चाऱ्याची उपलब्धता

 खते आणि कीटकनाशके अंदाजाने वापरण्याऐवजी माती परीक्षण, पीकस्थिती आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरावीत. बियाणे, खते आणि औषधे एकत्रित खरेदी करणे, यंत्रसामग्री सामायिक वापरणे आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून खर्च विभागून घेणे शक्य आहे. पीकविमा, शासकीय मदत आणि रोजगार योजनांची माहिती अधिकृत यंत्रणांकडून घ्यावी. पशुधन आणि चाऱ्याची बचत करावी, जनावरे ही ग्रामीण कुटुंबांची महत्त्वाची संपत्ती आहे. उपलब्ध चारा मोजून वापरावा आणि चाऱ्याची नासाडी होणार नाही, अशी व्यवस्था करावी. पिकांचे सुरक्षित अवशेष योग्य पद्धतीने साठवावेत. शक्य असल्यास चारा उत्पादनासाठी नियोजन करावे. जनावरांना स्वच्छ पाणी नियमित उपलब्ध करून द्यावे. त्यांच्या आहारात अचानक बदल करू नये आणि पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. चाऱ्याची टंचाई गंभीर झाल्यास चारा छावण्या किंवा अन्य शासकीय सुविधांसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

रोजगार, बचत आणि सामूहिक मदत

शेतीतून उत्पन्न कमी झाल्यास ग्रामपंचायत आणि रोजगार हमी यंत्रणेकडे उपलब्ध कामांची माहिती घ्यावी. पात्रतेनुसार रोजगार व मदत योजनांसाठी अर्ज करावा. घरातील उपलब्ध धान्याचे नियोजन करावे. आर्थिक अडचणीच्या काळात जास्त व्याजाचे कर्ज घेण्याऐवजी अधिकृत मदत आणि उपलब्ध पर्याय तपासावेत. दुष्काळ हा केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न नसून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी आणि सेवाभावी संघटनांनी गरजू कुटुंबांना अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य किंवा आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करावी. ही मदत स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आणि लाभार्थ्यांची प्रतिष्ठा जपत करावी.

घरखर्चाचे नियोजन करा; अनावश्यक खर्च टाळा

 दुष्काळात उत्पन्न कमी होण्याची शक्यता असताना कुटुंबाने मासिक खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवावा. अन्नधान्य, औषधे, शिक्षण, वीज आणि आवश्यक प्रवास यांसाठीचा खर्च प्रथम बाजूला ठेवावा. अनावश्यक खरेदी, महागड्या वस्तू, दिखाऊपणा आणि परवडत नसताना घेतलेले कर्ज टाळावे. बाजारात जाण्यापूर्वी आवश्यक वस्तूंची यादी करावी. काटकसरीने खरेदी करायचे आहे आवश्यक तीच खरेदी करायची आहे हे लक्षात घेऊनच बाजारात पाऊल ठेवणे उपयुक्त ठरेल.आठवड्याचा भाजीपाला आणि महिन्याचा किराणा नियोजन केल्यास अनावश्यक खरेदी कमी होते. यंदाच्या दिवाळीत फटाके, महागडे कपडे, सजावटीच्या वस्तू आणि अनावश्यक भेटवस्तूंवरील खर्च कमी करता येईल. सणाचा आनंद साधेपणानेही घेता येतो. आज वाचवलेली रक्कम पुढील काही महिन्यांतील अडचणींसाठी उपयोगी पडू शकते. मात्र, काटकसर करताना पोषण, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.

काटकसर हीच सामूहिक ताकद

 दुष्काळ पूर्णपणे टाळणे प्रत्येकाच्या हातात नसले, तरी त्याचे परिणाम कमी करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करू शकतो.अगदी समूह शेती सारख्या सहकार तत्वाचा स्वीकार करणे. सार्वजनिक पानवठ्यांचा योग्य वापर करणे, घरात पाण्याची बचत, शेतीत खर्चाचे नियोजन, पशुधनाची काळजी, अनावश्यक खरेदीला आळा आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे, या कृती संकटाची तीव्रता कमी करू शकतात. सण-उत्सवात आपल्या शेजाऱ्याची परिस्थिती समजून घेणे आणि शक्य ती मदत करणे हेही सामाजिक दायित्व आहे. अशावेळी सण देखील सामूहिकरित्या साजरे केले जाऊ शकतात. एकत्रित येऊन साधेपणाने उत्सव साजरा केला जाऊ शकतो. त्यासाठी पुढाकार कोण घेईल याची वाट पाहता एक पाऊल पुढे टाकून गावागावात वेगवेगळे उपक्रम राबविणे गरजेचे ठरते.

दुष्काळ भविष्याची बांधणी करतो

 यापूर्वीही अनेकदा दुष्काळाचा सामना दुष्काळी प्रदेशाने केला आहे.मात्र,ज्याच्याकडे मदतीची दानत आहे त्यांनी इतरांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. सामान्यातला सामान्यमाणूस एकत्रित येऊन अशा वेळी असामान्य कामे करू शकतात. त्यामुळे विवाहसोहळ्यांना सामूहिक स्वरूप देण्यापासून तर सण उत्सवही एकत्रित करण्यापर्यंत अनेक उपाययोजना गावागावात होऊ शकतात. खरे तर अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी निसर्ग दुष्काळाच्या नावाने एक संधीही निर्माण करत असते. मराठवाड्यातील प्रत्येक गाव पाणीदार व्हावे, प्रत्येक गावाचे पाण्याचे ऑडिट व्हावे,त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी या दुष्काळात चिंतन होणे गरजेचे आहे.शासनस्तरावरून सर्वांची काळजी घेतली जाते मात्र गावे जर स्वावलंबी बनली तर अशावेळी प्रशासनालाआणखी मदत होते. त्यामुळे या दुष्काळात खर्चापासून पाण्याच्या बचतीपर्यंत थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे दुष्काळावर मात करणाऱ्या घटकांसाठी प्रयत्न करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय

छत्रपती संभाजीनगर मोबाईल न.9702858777


Post Views: 14










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search