अथर्व नानोरे हत्या प्रकरणाचा उलगडा:३ आरोपी अटकेत, वडिलांच्या ओळखीच्यांनीच रचला होता हत्येचा कट

0
image-resize-color-correction-and-ai-2026-04-06t16_1775471712.png




१४ वर्षीय अथर्व नानोरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत हे आरोपी पकडले गेले. अटक करण्यात आलेले आरोपी २० ते २२ वयोगटातील असून, त्यात अथर्वच्या वडिलांच्या ओळखीच्या एका व्यक्तीचाही समावेश आहे. ७२ तासांच्या कसून चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व तपशील उघडकीस आणले. संशयित आरोपींची नावे जयराम गोपाल यादव (१९), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२) आणि आयुष मोहन साहू (१९) अशी आहेत. अथर्व दिलीप नानोरे हा गिट्टीखदान परिसरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत सहभागी झाला होता. मिरवणूक संपल्यानंतर तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी सुरुवातीला स्वतः शोध घेतला. काही माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गिट्टीखदान पोलिसांच्या तपासात समोर आले की, अथर्वचे वडील भाजी विक्रेते आहेत. आरोपी त्यांच्याकडून नियमितपणे भाजीपाला खरेदी करत होते आणि त्यांचे कर्जदार होते. अथर्वचे वडील घाऊक भाजी विक्रेते असल्याने त्यांच्याकडे रोख रक्कम असते, हे आरोपींना माहीत होते. याच पैशांच्या लोभातून तिन्ही आरोपींनी घटनेच्या तीन दिवस आधी अथर्वच्या अपहरणाचा कट रचला. या कटानुसार, अथर्वचे अपहरण करून त्याला दूर नेण्याची जबाबदारी जयरामवर सोपवण्यात आली होती. घटनेच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला. त्याचवेळी, जयरामने त्याला बहाणा करून एका टाटा एस गाडीजवळ नेले. तिथे आयुष आणि कुणाल आधीच वाट पाहत होते. तिघांनी अथर्वला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तो आवाज करण्यापूर्वीच त्याच्या तोंडात कापड कोंबले. आरोपींनी त्याला गोरेवाडाच्या दिशेने नेले. मात्र, गिट्टीखदान परिसरातील गोंधळ पाहून ते घाबरले. त्यांनी कापडाच्या तुकड्याने अथर्वचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि आपापल्या घरी परतले. खून केल्यानंतर, आरोपींनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ फेकून दिला. कोणताही पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी गाडी धुतली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही संपूर्ण कारवाई केली. अथर्व नानोरे बेपत्ता झाल्यानंतर, पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमुळेच या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *