जालन्यात जमिनीतून 'लाव्हा'सदृश गरम पदार्थ बाहेर:राजपूत वाडी परिसरात घबराट, विद्युत खांबाजवळील घटनेने खळबळ
![]()
जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी (दि. ५) दुपारी एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका विद्युत खांबाजवळील जमिनीतून अचानक लाव्हासारखा धगधगता आणि चिकट पदार्थ बाहेर पडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना विद्युत खांबाच्या पायाशी गरम, अर्धद्रवरूप आणि शिलारसासारखा (लाव्हा) दिसणारा पदार्थ बाहेर येऊ लागला. जमिनीतून असा पदार्थ बाहेर येत असल्याचे पाहून नागरिक भयभीत झाले. काही तरुणांनी या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने शहरात या ‘लावा’ची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ या ठिकाणापासून दूर जाणे पसंत केले. प्रशासनाची धाव आणि प्राथमिक अंदाज घटनेची गांभीर्य ओळखून नागरिकांनी तत्काळ महावितरण विभागाला याची माहिती दिली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जमिनीखालील अतिरिक्त उष्णतेमुळे असा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. विद्युत गळती की रासायनिक प्रक्रिया? हा पदार्थ नेमका काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही. मात्र, विद्युत खांबाजवळून हायव्होल्टेज वायर जात असल्याने जमिनीत विद्युत गळती (Earth fault) होऊन प्रचंड उष्णता निर्माण झाली असावी आणि त्या उष्णतेमुळे जमिनीतील दगड, माती किंवा प्लास्टिकच्या केबल वितळून हा लाव्हासारखा पदार्थ तयार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन महावितरण आणि महसूल विभागाकडून या घटनेचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. “वस्तुस्थिती समोर येईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संबंधित जागेपासून सुरक्षित अंतर राखावे,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे भूगर्भातील हालचालींबाबतही काही तर्कवितर्क लढवले जात असले तरी, तज्ज्ञांच्या अहवालानंतरच खरा प्रकार समोर येईल. हे ही वाचा… ग्राहकाला ओटीपी येऊनही सर्व्हर डाऊनमुळे सिलिंडर मिळेना:पहाटे ४ वाजल्यापासून ग्राहकांनी सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सीसमोर लांबच लांब रांग घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, रांजनी तसेच राणी उचेगाव येथे गॅस एजन्सीचे वितरक आहेत. कुंभार पिंपळगाव तसेच तीर्थपुरी येथे पहाटे ४ वाजल्यापासून ग्राहकांनी सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सीसमोर लांबच लांब रांग लावल्याचे दिसून आले. दरम्यान ओटीपी येऊनही सर्व्हर डाऊन असल्याने, सिलिंडरचा तुटवडा असल्याने, भर उन्हात दिवसभर उभे राहूनही नागरिकांना सिलिंडर मिळाले नाहीत. त्यामुळे नाराजी पसरली आहे. सविस्तर वाचा…
