​वाईत गद्दारीचा निषेध:विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, पुतळ्याचे जोडे मारून दहन

0
image-resize-color-correction-and-ai-2026-04-06t17_1775476413.png




राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा करून भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत, सोमवारी (आज ) वाई शहरात विराज शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बावधन गटातील मतदारांनी भव्य निषेध मोर्चा काढला. “मतदारांशी बेईमानी करणाऱ्यांचा धिक्कार असो” अशा उपरोधिक आणि संतप्त घोषणांनी यावेळी संपूर्ण वाई शहर दणाणून गेले होते. ​नियोजित आराखड्याप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता महागणपती घाटावरून या मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा महात्मा फुले मंडईमार्गे धर्मपुरी पेठेतील विराज शिंदे यांच्या ‘विराज गॅस एजन्सी’वरून ब्राम्हणशाही मार्गे मुख्य किसन वीर चौकात पोहोचला. विशेष म्हणजे, विराज शिंदे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी थांबून अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. ​मोर्चाचा समारोप किसन वीर चौकात झाला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी जि . प.सदस्य महादेव मस्कर आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन आप्पा भोसले यांनी आपली निषेधपर मनोगते व्यक्त केली. “ज्या मतदारांनी विश्वासाने निवडून दिले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम विराज शिंदे पती-पत्नींनी केले आहे,” अशी टीका यावेळी करण्यात आली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी विराज शिंदे यांचा प्रातिनिधिक पुतळा तयार करून त्याला जोडे मारले आणि जाहीर दहन केले. ​या आंदोलनात वाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि बावधन गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने जि.प. सदस्या वृषाली चव्हाण, बापूसाहेब शिंदे, वर्षा जगताप, माजी सभापती दिलीप पिसाळ, सत्यजित वीर, शहर अध्यक्षा निशा डाळवाले, माजी जि. प. सदस्य शशिकांत पवार, बाजार समिती चेअरमन मोहन जाधव, बाजार समितीचे विनायक येवले, नगरसेवक सनी चव्हाण, संतोष ननावरे, निलेश शिंदे, विलास मांढरे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ​​मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. ​बावधन जिल्हा परिषद गटातील या राजकीय बंडाळीमुळे वाई तालुक्यातील राजकारण आता चांगलेच तापले असून, या गद्दारीचा हिशोब आगामी काळात मतदारच करतील, असा सूर या मोर्चातून उमटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed