बाटलीतले भूत बंद करण्याची ताकद असणाऱ्यांनीच ते बाहेर काढावे:गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

[ads1]


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मुंबईत धडकण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ठाण्यात सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ‘बाटलीतलं भूत आता अंगाशी येतंय’ सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना गणेश नाईक यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “सध्या सरकारमधील सर्व मंत्री टेन्शनमध्ये आहेत. एका बाजूला राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना, दुसऱ्या बाजूला मात्र केवळ धर्म आणि जातीच्या नावाने राजकारण सुरू आहे. आता या सगळ्याचा ताप खुद्द राज्यकर्त्यांनाच होऊ लागला आहे. काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझता विझेनाशा झाल्या आहेत. बाटलीतून बाहेर काढलेले भूत आता अंगाशी येत आहे. त्यामुळे हे भूत पुन्हा बाटलीत बंद करण्याची ज्या व्यक्तीत ताकद असेल, त्यांनीच ते बाहेर काढावे.” त्यांचा हा रोख थेट एकनाथ शिंदे यांच्या दिशेने असल्याचे मानले जात आहे. जरांगेंच्या आक्रमक भूमिकेची पार्श्वभूमी एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या शब्दाची पूर्तता न झाल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी थेट मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांना अश्रूही अनावर झाले होते. जरांगे यांच्या याच आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी ‘बाटलीतील भुता’चा दाखला देत केलेल्या या अप्रत्यक्ष टीकेमुळे जुन्या राजकीय वादात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. ————- हेही वाचा.. मनोज जरांगेंचा एल्गार, 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करणार:पाटोदा-खोपोलीमार्गे थेट आझाद मैदानात आमरण उपोषण; मार्ग जाहीर करताना जरांगे भावुक मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि सगेसोयरे तसेच कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. आपल्या आमरण उपोषणाच्या 15व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत त्यांनी मुंबईला जाण्याचा सविस्तर मार्ग, मुक्काम आणि आंदोलनाची संपूर्ण रणनीती जाहीर केली. “ही मराठ्यांची अंतिम आणि निर्णायक लढाई असून, आपण शांततेच्या मार्गाने मुंबईत जाऊन जिंकूनच माघारी येणार आहोत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *