खुलताबाद, फुलंब्री तालुक्यात 30 दिवसांनी पाऊस‎:पैठण, वेरूळ, ढोरकीन, घाटनांद्रा, करमाड, शिऊर, सिल्लोड परिसरात रिमझिम हजेरी‎

[ads1]


खुलताबाद, वेरूळ, फुलंब्री, सोयगावमध्ये मागील ३० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. पाण्याअभावी खरिपातील पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाने या भागात एक तास हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, पैठण, कातपूर, करमाड, शिऊर, ढोरकीन, घाटनांद्रा, वेरूळ परिसरातही रिमझिम पाऊस झाला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील खरीप पिके अक्षरशः माना टाकू लागली होती. ऐन हंगामात हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी रोज आभाळाकडे डोळे लावून बसले होते. या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मका, तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी आणि भाजीपाल्याला मोठा आधार मिळाला आहे. फुलंब्री तालुक्यात गेल्या ३० दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी पावसाने अखेर रिमझिम हजेरी लावली. या पावसामुळे सिंचनाची सोय असलेल्या बागायती क्षेत्रातील पिकांना तात्पुरते जीवनदान मिळाले असले, तरी कोरडवाहू क्षेत्रातील पिके प्रदीर्घ खंडामुळे पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस कमी असल्याने नदी-नाल्यांना पूर आला नाही. पावसाळा संपत आला तरी मोठा पाऊस न झाल्याने तालुक्यात ३ ते ४ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या काळात पाऊस होण्याचा अंदाज सुमारे ७५ टक्के व्यक्त करण्यात आला आहे. १४ सप्टेंबरपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. शनिवारी झालेला हा रिमझिम पाऊस पिकांना तात्पुरता आधार देणारा ठरला असला, तरी विहिरींची पातळी वाढण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा मुळांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. फुलंब्रीत कोरडवाहू पिके वाया; बागायतीस दिलासा सोयगाव परिसरामधील शेतांमध्ये साचले पाणी : सोयगाव परिसरात ३१ दिवसांच्या खंडानंतर शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने पुनरागमन केले. सोयगाव व जरंडी मंडळात मध्यम, तर फर्दापूर व सावळदबारा मंडळात जोरदार पाऊस झाला. शनिवारी दिवसभर रिमझिम संततधार सुरू राहिल्याने शेतीची कामे ठप्प झाली होती. पावसामुळे खरिपाला दिलासा मिळाला असला तरी काही शेतांमध्ये पाणी साचल्याने नुकसानीची भीती आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *