[ads1]
![]()
जुन्या 5 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात तब्बल 51 लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून वरळी परिसरातील एका व्यक्तीची 3 लाख 3 हजार 231 रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवरील रील पाहिल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यामध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगत त्याच्याकडून पैसे उकळले. नेमकं प्रकरण काय? तक्रारदाराने इन्स्टाग्रामवर जुन्या 5 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळत असल्याची रील पाहिली होती. जुन्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या नोटांना लाखो रुपयांची किंमत मिळू शकते, असा दावा या रीलमध्ये करण्यात आला होता. मोठी रक्कम मिळण्याच्या अपेक्षेने तक्रारदाराने रीलमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधला. व्हॉट्सॲपवर संपर्क झाल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडे असलेल्या जुन्या 5 रुपयांच्या नोटांचे फोटो मागितले. तक्रारदाराने 5 रुपयांच्या पाच जुन्या नोटांचे फोटो त्यांना पाठवले. फोटो पाहिल्यानंतर आरोपींनी या नोटांच्या बदल्यात तब्बल 51 लाख रुपये मिळवून देण्याचे सांगितले. यानंतर आरोपींनी व्यवहार सुरू करण्यासाठी काही रक्कम भरण्यास सांगितले. सुरुवातीला क्यूआर कोड पाठवून प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली 11 हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने ही रक्कम भरल्यानंतर आरोपींनी आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. कधी प्रक्रिया शुल्क, तर कधी इतर कारणे सांगून तक्रारदाराला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. 4 जून ते 12 जून 2026 या कालावधीत तक्रारदाराने आरोपींच्या सांगण्यावरून अनेक व्यवहार केले. या सर्व व्यवहारांमधून त्याच्याकडून एकूण 3 लाख 3 हजार 231 रुपये घेण्यात आले. मात्र, एवढी मोठी रक्कम भरल्यानंतरही तक्रारदाराला सांगितलेले 51 लाख रुपये मिळाले नाहीत. त्यानंतर आरोपींकडून पुन्हा पैशांची मागणी होऊ लागल्याने तक्रारदाराला संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल तक्रार मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66(C) आणि 66(D), तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) आणि 319(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींनी वापरलेले व्हॉट्सॲप क्रमांक, क्यूआर कोड आणि पैसे जमा करण्यासाठी दिलेली बँक खाती यांची माहिती तपासली जात आहे. या व्यवहारांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. जुन्या नोटा आणि नाण्यांच्या जाहिरातींपासून सावध राहा जुन्या नोटा किंवा नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये मिळतील, अशा जाहिराती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विशेष क्रमांकाच्या किंवा जुन्या नोटांना मोठी किंमत मिळत असल्याचे सांगून नागरिकांना अशा जाहिरातींच्या माध्यमातून संपर्क करण्यास प्रवृत्त केले जाते. सुरुवातीला आरोपी कमी रक्कम मागतात. त्यानंतर प्रोसेसिंग फी, जीएसटी, नोंदणी शुल्क किंवा इतर कारणे सांगून वारंवार पैसे मागितले जातात. अशा प्रकारे नागरिकांकडून मोठ्या रकमा उकळल्या जातात. त्यामुळे सोशल मीडियावर जुन्या नोटा किंवा नाण्यांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती दिसल्यास त्याची खात्री केल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये. अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या क्यूआर कोडवर पैसे पाठवणे किंवा त्यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करणे टाळावे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. हेही वाचा.. एमपीएससी वाचवायची असेल तर अध्यक्ष बदला: रोहित पवार:विवेक भीमनवारांचा राजीनामा घेऊन तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करा, अन्यथा 16 सप्टेंबरपासून आंदोलन आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी मागणी केली की, जर एमपीएससी वाचवायची असेल तर आयोगाचा अध्यक्ष बदलला पाहिजे. त्यांनी विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. अन्यथा, १६ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सविस्तर वाचा..
[ads2]
जुन्या ५ रुपयांच्या नोटेचे आमिष:51 लाखांच्या लालसेपोटी वरळीतील व्यक्तीला 3 लाखांचा गंडा
















Leave a Reply