चांदूर रेल्वे स्मशानभूमीच्या कामात मोठ्या अनियमितता व निकृष्ट दर्जा:नागरिकांकडून ठेकेदारावर कारवाईची मागणी, तातडीने पाहणीची मागणी

[ads1]


चांदूर रेल्वे शहरातील एकमेव हिंदू स्मशानभूमीच्या विकासकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाची तातडीने पाहणी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चांदूर रेल्वेतील हिंदू समाजासाठी ही एकमेव स्मशानभूमी आहे. अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या विकासकामाचा दर्जा चांगला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बांधकामात हलक्या दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. स्मशानभूमीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी होणारे काम दर्जेदार आणि टिकाऊ असणे गरजेचे आहे. शासन आणि नगरपरिषदेकडून या कामासाठी निधी खर्च केला जात असताना कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. संबंधित विभागाने स्मशानभूमीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि बांधकामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कामात काही दोष आढळल्यास ठेकेदारावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि निकृष्ट काम पुन्हा चांगल्या पद्धतीने करून घ्यावे, असे आवाहन यंत्रणेला करण्यात आले आहे. या संदर्भात काही जागरूक नागरिकांनी प्रसिद्ध वऱ्हाडी कवी सुरेश भट यांच्या कवितेचा संदर्भ दिला आहे. ‘जगण्याने छळले होते…मरणाने केली सुटका’ या कवितेचा उल्लेख करत, किमान शेवटचा प्रवास तरी चांगला व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्मशानभूमीच्या कामात निष्काळजीपणा करू नये, असा सूचक मुद्दा त्यांनी मांडला.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *