मराठी चित्रपटसृष्टीसाठी फडणवीसांची मोठी घोषणा:अधिक चित्रपटगृहे उपलब्ध करणार, आधुनिक चित्रनगरीही उभारणार

[ads1]


मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बळ देण्यासाठी राज्यात मराठी चित्रपटांना अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाने आराखडा तयार केला असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, सुविधा आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली आधुनिक चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी चित्रपटांची कलात्मक गुणवत्ता देशात सर्वोत्तम मराठी चित्रपटांचा आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही त्यांची मोठी वैशिष्ट्ये असून कलात्मकदृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी रंगभूमीला देशातील सर्वोत्तम रंगभूमी म्हणून पाहिले जाते. मराठी कलावंतांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही कायम ठेवली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीही सातत्याने पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एकाच ठिकाणी चित्रपट निर्मितीच्या आधुनिक सुविधा चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विविध प्रकारचे सेट्स, चित्रिकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास चित्रपट निर्मिती अधिक सुलभ होईल, असा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटगृहांची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मान्यवरांचा पुरस्काराने गौरव यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत स्वतंत्र संगीतविश्व निर्माण केले. ज्ञानेश्वर माऊली, वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांच्या संगीतनिर्मितीतून मराठी संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ आणि ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या अजरामर रचनांचा उल्लेख करत त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या योगदानाचे कौतुक केले. सलीम-जावेदच्या लेखनाने हिंदी चित्रपटसृष्टीला नवे वळण सलीम-जावेद या जोडीने तसेच सलीम खान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण दिले. ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावी नायक आणि अजरामर व्यक्तिरेखा निर्माण करण्यात त्यांच्या लेखनाचा मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘अँग्री यंग मॅन’ ही संकल्पना लोकप्रिय करण्यात त्यांच्या लेखनाचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रसाद ओक यांचा ‘360 डिग्री मॅन’ म्हणून गौरव अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या कार्याचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कलेच्या क्षेत्रातील ‘360 डिग्री मॅन’ असे संबोधले. अभिनयासह विविध क्षेत्रांत त्यांनी प्रभावी काम केले आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांची त्यांनी साकारलेली भूमिका अत्यंत प्रभावी ठरल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पुढील कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘मर्दानी’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी स्त्रीकेंद्री भूमिका प्रभावीपणे मांडल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. रामटेक आणि नाशिकमध्ये नव्या फिल्म सिटीची तयारी दरम्यान, महाराष्ट्रात आणखी दोन ठिकाणी फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने राज्य शासन काम करत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. रामटेक आणि नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने शासन काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि मुंबईची ओळख जगभरात चित्रपट नगरी म्हणून आहे. मराठी तसेच अन्य भाषांतील चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राने भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध परंपरा दिली आहे. ही परंपरा पुढे नेत चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचे शेलार म्हणाले. मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूरमधील चित्रिकरण सुविधांसोबतच रामटेक व नाशिक येथे नव्या फिल्म सिटी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या योगदानाचा गौरव चित्रपटसृष्टीतील ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन कलाकार, तंत्रज्ञ तसेच अन्य सहकाऱ्यांनी महाराष्ट्राची समृद्ध चित्रपट परंपरा जगभर पोहोचवली आहे. या सर्वांच्या योगदानाला नमन करत असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीचे वर्ष आहे. मानवी मूल्यांवर आधारित त्यांच्या चित्रपटांनी रसिकांना समृद्ध केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात निर्माण होणारे मराठी तसेच अन्य चित्रपट अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत, तसेच चित्रपट निर्माते, व्यावसायिक, कलाकार आणि तंत्रज्ञांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. विविध विभागांतील पुरस्कारांचे वितरण 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट कला दिग्दर्शन, उत्कृष्ट छायालेखन, उत्कृष्ट संकलन, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण, उत्कृष्ट ध्वनीसंयोजन, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट रंगभूषा आणि उत्कृष्ट बालकलाकार यांसह चित्रपटसृष्टीतील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकार व तंत्रज्ञांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हेही वाचा.. मुस्लिम बांधवांनी गरब्यात सहभागी होण्यात काहीही गैर नाही!:अमृता फडणवीसांची परखड भूमिका; शांततेने उत्सवाचा आनंद घ्यायला हरकत नाही! गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरब्यात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी होत असतानाच मंत्री नितेश राणे यांनीही ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करत मुस्लिम तरुणांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *