अमरावतीत महिनाभरापासून पाऊस नाही, पिके धोक्यात:युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दुष्काळ उपाययोजनांची मागणी केली

[ads1]


अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकारी आणि विभागीय कृषी सहसंचालक यांना निवेदन दिले. प्रशासनाने दुष्काळ गृहीत धरून उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपलब्ध नोंदीनुसार, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत असून, शेती व्यवस्था संकटात सापडली आहे. ही दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था, शेतमजुरांना रोजगार तसेच उपलब्ध सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावर आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, भातकुली तालुका अध्यक्ष मंगेश इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष धीरज केने, तालुका अध्यक्ष अजय घुले, दशरथ येवले, पराग चांगोले, राहुल लोखंडे, कर्मण जोगराणा, प्रीतम घुगरूड, संजय भारसाकळे, अमोल कोरडे, आशिष कावरे, दिवाकर सगणे, देवानंद राठोड, ओमकार मोहोळ, कर्मण जोगराणा आणि ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय किसान सभेनेही दुष्काळसदृश स्थितीत उपाययोजना सुरू करण्याची मागणी केली आहे. किसान सभेचे प्रदेश सचिव अशोक सोनारकर आणि जिल्हा पदाधिकारी प्रा. विजय रोडगे, प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे हा मुद्दा मांडला.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *