Vijaya Rahatkar Grants Financial Aid to Hingoli Runner Ramabai Ranveer

[ads1]

पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या तसेच अंबाजोगाईतील मॅरेथॉनमध्ये साडी नेसून व अनवाणी धावून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 47 वर्षीय रमाबाई अशोक रणवीर यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोग धावून आला आहे.

.

पुरस्काराच्या रकमेतून 1 लाखांची मदत; विजया रहाटकर यांनी साधला संवाद

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रमाबाईंशी व्हिडिओ कॉल आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला व या आर्थिक मदतीची माहिती दिली. या संदर्भात माहिती देताना विजया रहाटकर म्हणाल्या, “आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी साडीचा पदर सावरून आणि पायातील चप्पल हातात घेऊन अनवाणी धावणाऱ्या रमाबाईंची कहाणी संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारी आहे. एका आईमध्ये किती अफाट धैर्य, जिद्द आणि समर्पण असू शकते, याचे त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत.”

पुरस्कारातील रकमेतून कृतज्ञता

“काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या वतीने मला ‘आचार्य तुलसी कर्तृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारासोबत मिळालेल्या रोख रकमेतून 1 लाख रुपये मी रमाबाईंना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही त्यांच्या संघर्षाची किंमत नसून, त्यांनी समाजाला दिलेल्या प्रेरणेप्रती व्यक्त केलेली कृतज्ञतेची छोटीशी भावना आहे.”

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार

रमाबाई या मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील असल्याने, विजया रहाटकर यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशीही थेट संपर्क साधला. रमाबाई आणि त्यांच्या दोन्ही मुलींना विविध शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

साडीचा पदर, हातात चप्पल अन् अनवाणी पाय; कशी जिंकली मॅरेथॉन?

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अंबाजोगाई येथे 31 ऑगस्ट रोजी ‘अमृत दौड’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भाग्यनगर चौक या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत ट्रॅकसूट आणि आधुनिक स्पोर्ट्स शूज घातलेले अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

याच गर्दीत 47 वर्षांच्या रमाबाई रणवीर साधी साडी नेसून आणि पायात स्लीपर घालून उभ्या राहिल्या. धावताना पायातील साध्या चपला वारंवार निसटू लागल्याने त्यांनी धावण्याचा वेग कमी न करता थेट चपला हातात घेतल्या. एका हातात चप्पल आणि दुसऱ्या हाताने साडीचा पदर सावरत त्या रस्त्यावरील खडे, गारठा व ओलावा पार करत धावत सुटल्या. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असणाऱ्या धावपटूंना मागे टाकत त्यांनी फिनिशिंग लाईनवर सर्वात आधी पाऊल ठेवले आणि पहिला क्रमांक पटकावला. त्यांच्या या जिद्दीने उपस्थितांचे डोळे पाणावले.

मी रोज मुलांच्या भविष्यासाठी धावते, आज स्वतःसाठी धावले

स्पर्धेत मिळालेले ३ हजार रुपयांचे बक्षीस स्वीकारताना रमाबाईंना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांनी संपूर्ण महाराष्ट्र हेलावून गेला. “मी रोज माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आणि पोटासाठी धावत असते; आज मी स्वतःसाठी धावले,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले होते. पतीच्या निधनानंतर रमाबाई हिंगोलीहून अंबाजोगाईत आल्या. त्या एका अकॅडमीत स्वयंपाकी म्हणून काम करतात आणि कष्टाच्या पैशांतून मुलींचे शिक्षण करत आहेत.

त्यांची एक मुलगी सध्या बी.एस्सी.चे शिक्षण घेत असून दुसरी मुलगी पोलीस भरतीची कसून तयारी करत आहे. जिद्दीच्या जोरावर ३ हजारांचे बक्षीस जिंकणाऱ्या रमाबाईंच्या संघर्षाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, मिळालेल्या १ लाख रुपयांच्या मदतीमुळे त्यांच्या दोन्ही मुलींच्या उच्च शिक्षणाला आणि पोलीस होण्याच्या स्वप्नाला मोठे बळ मिळाले आहे.

हेही वाचा…

लेकींच्या भविष्यासाठी अनवाणी धावली आई: अंबाजोगाईत 47 वर्षीय रमाबाईंनी जिंकली मॅरेथॉन, 3 हजारांचे बक्षीसही शिक्षणासाठी दिले

सकाळची वेळ… मॅरेथॉनसाठी तरुण-तरुणींची लगबग सुरू होती. कुणी धावण्याआधी शरीर गरम करण्यासाठी उड्या मारत होते, कुणी बुटांच्या नाड्या घट्ट बांधत होते, तर कुणी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज होत होते. त्याचवेळी साधी साडी नेसलेली एक महिला तिथे आली. पायात साध्या स्लीपर होत्या. तिला पाहून कुणालाही ही महिला स्पर्धेत धावेल आणि चक्क पहिला क्रमांक पटकावेल, असे वाटले नसते. पण शिट्टी वाजली आणि पुढच्या काही मिनिटांत या महिलेने उपस्थितांना जिद्द, संघर्ष आणि मातृत्वाचा असा धडा दिला की, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *