नागपुरात पहाटेचा थरार:भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, चालकाने मद्यपान केल्याचा संशय

[ads1]


नागपुरातील जपानी गार्डन रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास सनोडिया असे या अपघातात प्राण गमावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास 3 गाड्या अत्यंत वेगाने एकमेकांशी शर्यत लावत जात असल्याचा संशय आहे. या शर्यतीदरम्यान एका भरधाव कारचा ताबा सुटला आणि ती थेट जपानी गार्डनच्या भिंतीवर जाऊन धडकली. याच वेळी रस्त्यावरून ‘मॉर्निंग वॉक’ करत जात असलेल्या कैलास सनोडिया यांना या कारने जोरदार धडक देऊन चिरडले. अपघातानंतर सोबत असलेल्या 2 कारचालकांनी मदतीसाठी न थांबता तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून त्यातील एक व्यक्ती गाडीमध्येच अडकून पडली होती. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कारमधील चालकाने किंवा प्रवाशांनी मद्यपान केले असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत असून पळून गेलेल्या इतर दोन गाड्यांचा शोध सुरू आहे. ओव्हरटेकच्या चढाओढीमध्ये दोन‎दुचाकींचा अपघातात:तरुणाचा मृत्यू‎, खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना, मृत युवक चिखली येथील
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथे दर्शनासाठी शुक्रवारी रात्री हजारो भाविक येत असताना संभाजीनगर-खुलताबाद मार्गावर दोन स्पोर्ट बाइकस्वारांच्या ओव्हरटेकच्या चढाओढीत अपघात झाला. यात एका दुचाकीवरील ताबा सुटल्याने 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. विजय अजय ठेंग (18, रा. शहापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. विजय हा (एमएच 20 एचएम 3997) बाइकवरून खुलताबादच्या दिशेने येत होता. सोबत आणखी एक स्पोर्ट बाइकस्वार जात असताना दोघांमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची चढाओढ सुरू झाली. यातून हा अपघात घडला. याच दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सध्या भद्रा मारुती दर्शन व उरुसामुळे या मार्गावर भाविकांची वर्दळ आहे. अशा स्थितीत भरधाव गाड्या चालवणे जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक बंदोबस्त वाढवून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर गवळी तपास करीत आहेत.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *