मानवी सेवनास अयोग्य असल्याचा संशय असलेली 40 टन सुपारी वडोदा पोलिसांनी जप्त केली. महालगाव-लिगाव परिसरातील नवकर वेअरहाऊसवर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. चार वाहनांमध्ये आणला जात असलेला सुपारीचा साठा आणि वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. मालाची गुणवत्ता, मूळ ठिकाण आणि तो कुणाला पुरवला जाणार होता, याचा तपास आता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीसह केला जाणार आहे. पोलिसांनी सुपारीच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी एफडीएशी पत्रव्यवहार केला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच हा माल मानवी सेवनासाठी अयोग्य आहे का, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, हे स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या जप्त मालाला ‘घातक’ ठरवण्याऐवजी त्याच्या गुणवत्तेबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास अहवालावर अवलंबून आहे. चार वर्षांपूर्वी 11.50 कोटींची जप्ती डिसेंबर 2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नागपूर आणि गोंदिया परिसरातील गोदामांवर कारवाई करत 289.57 टन बेहिशेबी सुपारी जप्त केली होती. या मालाचे मूल्य सुमारे 11.50 कोटी रुपये होते. ईडीच्या तपासानुसार, इंडोनेशियातून आणलेली सुपारी भारत-म्यानमार सीमेवरून तस्करीने देशात आणली जात होती. पुरवठादार, कमिशन एजंट, वाहतूकदार, लॉजिस्टिक सेवा पुरवठादार, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांची साखळी कार्यरत असल्याचे तपासात नमूद झाले. बनावट मूळ-प्रमाणपत्रे आणि बोगस किंवा कमी मूल्य दाखवणाऱ्या बिलांचा वापर करून सीमाशुल्क चुकवल्याचा आरोपही होता. आधीही निकृष्ट सुपारीच्या कारवाया जून 2020 मध्ये एफडीएने नागपुरातील वर्धमान परिसरातून 39,213 किलो निकृष्ट सुपारी जप्त केली होती. तिचे मूल्य 1.01 कोटी रुपये होते. फेब्रुवारी 2024 मध्ये कळमना पोलिसांनी 20 टन निकृष्ट सुपारीचा 54 लाख रुपयांचा साठा पकडला. त्या प्रकरणात माल आसामच्या नोंदणीच्या ट्रकमधून आणला जात होता. इंडोनेशिया, मलेशिया आणि श्रीलंकेहून येणारी स्वस्त सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याचे काही पूर्वीच्या तपासांत संशयित व्यवहारांबाबत नोंदले गेले आहे. मात्र, नवकर वेअरहाऊसमधील साठा याच देशांतून आला किंवा त्याचा आंतरराष्ट्रीय तस्करीशी संबंध आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. पोलिसांच्या तपासात पुरवठादार, वाहतूक कागदपत्रे, साठा नोंदवही आणि संभाव्य खरेदीदारांची माहिती महत्त्वाची ठरणार आहे. सुपारीच्या बाजारमूल्याबाबतही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. निकृष्ट मालाचा दर दर्जानुसार बदलत असल्याने 40 टन साठ्याची किंमत एफडीए ठरवेल. मात्र या मालाची किंमत 60 ते 70 लाख असल्याचे सांगितले जाते. 2024 मधील कारवाईत 20 टनांसाठी 54 लाख रुपये मूल्य नोंदले गेले होते. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचा प्रयत्न:फडणवीस-शिंदेंनी तपास केला नाही तर जनता समजेल हे त्यांनीच घडवलं- मनोज जरांगे