कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथे वनक्षेत्रात राहणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर राजकीय दबावातून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कुटुंबांना हक्काचा निवारा द्यावा, तसेच कथित गैरवर्तन करणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी नेते अॅड. मंगेश ससाणे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. येवलेवाडीतील वनक्षेत्रात मरीआईवाले, गोसावी, पोतराज, गोंधळी आदी भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबे पाल टाकून राहत आहेत. त्यांना कायमस्वरूपी जागा आणि घरकुल मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ससाणे यांनी सांगितले. मात्र, या प्रश्नावर भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल झाल्याचा आरोप त्यांनी केला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद रासकर यांच्यासह जगताप आणि पाटील या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वानवडी येथील वन विभागाच्या कार्यालयात चर्चा करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांशी अयोग्य वर्तन करण्यात आल्याचा, तसेच महिलांना शिवीगाळ करून एका अल्पवयीन मुलीला केसाला धरून उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी वनाधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे. संबंधित वनजमिनीवर के. जे. एज्युकेशन ट्रस्टचा कथित दावा असल्यास त्याची कागदपत्रांसह पडताळणी करावी, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, हा प्रश्न ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आणि वनमंत्र्यांकडे मांडल्याचे ससाणे यांनी सांगितले. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित कुटुंबांना जागा व घरकुल देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा आणि पुनर्वसनासाठी प्रस्ताव सादर केल्याचा दावाही त्यांनी केला. दाखल गुन्ह्यांची चौकशी करून, आरोप सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कारवाई करावी आणि पुनर्वसनासाठी कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation निकमार विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात 1,369 विद्यार्थ्यांना पदव्या:12 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके; पहिल्या पीएच.डी. संशोधकाला पदवी प्रदान