१८ जणांवर कारवाई; ६२.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी) –  लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पाठविलेल्या विशेष पथकाने मटका बुकी, जुगार अड्डा आणि अवैध वाळू उपशावर धडक कारवाई केली. २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या तीन कारवायांत १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, एकूण ६२ लाख ५१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मटका बुकीवर छापा; नऊ जणांवर गुन्हा

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच दिगंबर चौक परिसरात दगडू शेठ यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका बुकीवर विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत ९ हजार ८९० रुपये रोख आणि ११ मोबाईल, असा एकूण ६६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिर्रट जुगारावर कारवाई; सहा जण ताब्यात

मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर येथे अप्पा मस्के यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. यावेळी १८ हजार ३० रुपये रोख, आठ मोबाईल आणि चार मोटारसायकली, असा एकूण २ लाख ८० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तिरू नदीपात्रात अवैध वाळू उपसा

जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विशेष पथकाने रात्री ११.५५ वाजता जळकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सुल्लाळी शिवारातील वाळू धक्क्यावर छापा टाकला. यावेळी तिरू नदीपात्रातून पोकलेनच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा करून तिची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत एक पोकलेन मशीन, दोन ट्रॅक्टर आणि नदीपात्रातून काढून ठेवलेली वाळू, असा एकूण ५९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खबर हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन

या तिन्ही कारवायांत पोलिसांनी एकूण २७ हजार ९२० रुपये रोख, १९ मोबाईल, एक पोकलेन मशीन आणि दोन ट्रॅक्टरसह ६२ लाख ५१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. दरम्यान, नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ९१५०१००१०० या क्रमांकावर खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी या हेल्पलाइनवर अवैध व्यवसायांची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search