बसमत (प्रतिनिधी) – येथील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तलावाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हजुरी पाठी संघटनेने आता पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत नवघरे यांना नुकतेच निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमकी समस्या काय?
बसमत येथील ऐतिहासिक गुरुद्वारा दमदमा साहिब येथे दररोज देश-विदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या गुरुद्वाराच्या शेजारीच एक जुना तलाव आहे. सध्या या तलावाचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे; परंतु संतापजनक बाब अशी की, गुरुद्वाराच्या बाजूने असलेल्या नाल्याचे सांडपाणी थेट या तलावात मिसळत आहे. यामुळे तलावात मोठ्या प्रमाणावर घाण साचली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
प्रशासकीय उदासीनता:
यापूर्वीही संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (बसमत), नगरपरिषद अध्यक्ष आणि तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून या समस्येची जाणीव करून देण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या अनदेखीमुळे दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गुरुद्वारा परिसरातील पवित्रता जपण्यासाठी आणि भाविकांच्या आरोग्याचा विचार करून या तलावाच्या कामात योग्य सुधारणा करावी आणि नाल्याचे पाणी तलावात जाण्यापासून थांबवावे, अशी आग्रही विनंती हजुरी पाठी संघटनेने केली आहे. या निवेदनावर अध्यक्ष स. दलजितसिंग बिशनसिंग हजुरी पाठी, उपाध्यक्ष स. प्रदिपसिंग जितसिंग रागी आणि सचिव स. जगदिपसिंग मोहनसिंग नंबरदार स,हुकम सिघ कराबिन, महिनदर सिघ पैदल हरनामसिंग चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Post Views: 112
