बातमी बदलाची:75 गावांनी पाणी साठवले; शेती उत्पन्नही तिप्पट झाले, राज्यात जालन्यात 2016 मध्ये 4 हजार पाण्याच्या टँकर्सची गरज भासली होती
![]()
मी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील पासोडी गावात आहे. गेल्या आठवडाभर येथील सरासरी तापमान ४०-४१ अंश सेल्सियसच्या आसपास होते. मराठवाड्याचा हा भाग देशातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भागांमध्ये गणला जातो. मात्र या वेळी कडक उन्हाळ्यातही येथे पाण्याची कोणतीही टंचाई जाणवली नाही. गावातील सर्व विहिरींमध्ये पुरेसे पाणी आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरींमधून पाइपद्वारे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत आहे. हे सुखद चित्र केवळ पासोडी गावाचेच नाही तर जालना जिल्ह्यातील जाफराबाद, अंबड आणि भोकरदन तालुक्यातील ७५ गावांमध्ये आहे. सन २०१६ च्या उन्हाळ्यात येथे पिण्यासाठीही पाणी नव्हते. ४ हजार पाण्याच्या टँकरद्वारे गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला होता. मग या गावांनी १० वर्षांत आपले नशीब स्वतः लिहिले. पावसाचे पाणी अडवण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान केले. बांधकामांच्या खर्चाचा १० टक्के वाटाही स्वतः जमा केला. अनेक कामे मनरेगांतर्गत करण्यात आली, ज्यामुळे लोकांना गावातच रोजगारही मिळाला. याचा परिणाम असा झाला की स्थानिक लोक आता वर्षातून तीन पिके घेत आहेत. स्थलांतरही थांबले आहे. बदल: पाण्याची अडचण दूर झाल्यावर महिला आत्मनिर्भर या मोहिमेमुळे गावातील पाणीटंचाई संपली आहे. ग्रा.पं.च्या विहिरींमधून पाइपद्वारे घरांपर्यंत पाणी मिळते. बोरगावचे ५९ वर्षीय शेतकरी यशवंतराव चव्हाण सांगतात की, पूर्वी आम्ही वर्षातून एक पीकही जेमतेम घेऊ शकत होतो, आता दोन ते तीन पिके घेतो. पाण्यामुळे शेती सुधारली. पूर्वी जिथे एका एकरात ६-७ क्विंटल पीक यायचे, तिथे आता २०-२५ क्विंटल येत आहे. दुग्धोत्पादनही अनेक पटींनी वाढले. पासोडीच्या सीमा एकनाथ खंदाडे सांगतात की, गावांमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून कर्जावर गायी खरेदी करतात. एकट्या पासोडी गावात दररोज ४ हजार लिटर दूध गावाच्या संकलन केंद्रावर जमा होते. याच गावातील लोक दरमहा केवळ दुधातूनच ३५ लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. प्रयत्न: चेक डॅम, स्टॉप डॅम, मातीचे बांध घालून पाणी अडवले २०१४ मध्ये द वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टने गावकऱ्यांसोबत मिळून उंचावरील भागात कंटूर ट्रेंच आणि बांध घातले. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे लावली. सखल भागात शेततळी, चेक डॅम, स्टॉप डॅम आणि मातीचे बांध तयार केले. जुने नाले, विहिरी आणि छोटे जलस्रोत खोल केले. यासाठी गावांत ग्राम विकास समिती स्थापन केली. बैठका झाल्या आणि लोकांना पाणी अडवण्याच्या पद्धती सांगण्यात आल्या. समस्याःपाणी आणण्यासाठी मुलांना शाळा सोडावी लागली जालन्याचा बहुतांश भाग खडकाळ आहे. जमीन पाणी धरून ठेवू शकत नाही. पाऊसही असमान असतो. परिणामी जमिनीत पाणी मुरत नाही. २०१६ पर्यंत अनेक गावांत विहिरी कोरड्या पडल्या होत्या. शेती मान्सूनवर अवलंबून होती. एक पीक घेणेही कठीण. महिला व मुले अनेक किमीवरून पाणी आणत. यामुळे मुलांची शाळा सुटून स्थलांतर सुरू झाले.
