राजकारण, अंधश्रद्धा आणि अत्याचार ; अशोक खरात प्रकरणाचा काळा चेहरा  


हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे की अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांच्या प्रभावाखाली जाणारा?

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणातील तपशील अत्यंत धक्कादायक स्वरूपाचे समोर येत आहेत. तथाकथित बाबा, बुवा आणि मांत्रिकांच्या प्रभावाखाली समाजातील अनेक स्तरांतील लोक अडकलेले असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. या प्रकरणात काही राजकारणी, अधिकारी, न्यायव्यवस्थेशी संबंधित व्यक्ती आणि काही सेलिब्रिटींची नावेही चर्चेत आली आहेत.

तक्रार करणारी महिला प्रथम 2021 साली अशोक खरात यांच्याकडे गेली होती. कुटुंबीयांच्या काही कारणांमुळे तिचे लग्न मोडल्याचे तिला वाटत होते, आणि त्यावर उपाय म्हणून ती या बाबांच्या संपर्कात आली. 29 डिसेंबर 2025 रोजी पहिली तक्रार अशोक खरात यांच्या नोंदवण्यात आली. या तक्रारीत पुण्याचे राजेंद्र जासूद आणि भायखळ्याचे दिनेश परब यांच्यावर पाच कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ही तक्रार स्वतः अशोक खरात यांनीच केली होती.

यानंतर 12 मार्च 2026 रोजी आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले. अशोक खरात यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या संशयित नीरज जाधव याच्याविरोधात अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिर्डी येथे गुन्हा दाखल झाला. या घटनांनंतर 18 मार्च 2026 रोजी अशोक खरात यांना अटक करण्यात आली. त्याआधीच, 13 मार्च रोजी वरिष्ठ स्तरावर विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते.

या प्रकरणात निवडक लोकांना लक्ष्य केले जात आहे का, किंवा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का, हा एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अशोक खरात यांच्यावरचे आरोप अत्यंत गंभीर आणि भयानक स्वरूपाचे आहेत. तरीही अनेक राजकीय नेते त्यांच्या संपर्कात कसे आले, हा देखील चिंतेचा विषय आहे.

तसेच, काही पत्रकारांनी या बाबांच्या विरोधात तक्रारी आणि माहिती उघड करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचे आरोप आहेत. राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समाजात नैतिकतेचे भान असते, तर अशा व्यक्तींना पदावर राहण्याची संधी मिळाली नसती, असे मत व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणात काही प्रमुख राजकीय व्यक्तींचे फोटो आणि संबंध समोर आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही या बाबांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत इशारे दिले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले, अशी टीका होत आहे.

तक्रारीनुसार, अशोक खरात महिलांना तू माझी मागील जन्मातील पत्नी/प्रेयसी आहेस असे सांगून त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकत. त्यानंतर प्रसाद म्हणून काही पदार्थ देऊन त्यांना गुंगी आणली जात असे आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. काही महिलांनी सांगितले की, त्यांना विधीच्या नावाखाली एकांतात नेऊन अशा प्रकारचे कृत्य केले जात असे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला. या कायद्यांतर्गत स्वतःला अलौकिक शक्ती असल्याचे सांगणे, पूर्वजन्माचे नाते सांगून फसवणूक करणे, अशा कृत्यांना गुन्हा मानले जाते. तरीही अशा प्रकारचे प्रकार सुरूच असल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बाबांच्या मालमत्तेबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील पाथर्डी येथे कोट्यवधींची मालमत्ता, सिन्नरमधील मोठ्या प्रमाणावर जमीन, फार्महाऊस, बंगले, तसेच शिर्डी आणि मुंबईत मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. काही अधिकाऱ्यांनीही त्यांच्याशी आर्थिक संबंध ठेवले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची तुलना देशातील इतर स्वयंघोषित बाबांशी केली जात आहे, ज्यांच्यावरही लैंगिक अत्याचारांचे आरोप झाले होते. अनेक महिलांनी 2021 ते 2025 या कालावधीत अशाच प्रकारच्या अनुभवांची नोंद केली आहे. या सर्व घटनांमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो  हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे की अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांच्या प्रभावाखाली जाणारा?

अशोक खरात यांना मदत करणारे प्रशासनातील अधिकारी, तसेच राजकीय पाठबळ देणारे सर्व संबंधित यांच्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. समाजानेही याबाबत सजग होऊन अशा प्रवृत्तींना थारा न देणे ही काळाची गरज आहे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *