किती उपयोगी? किती घातक? ‘मराठीकारण, महाराष्ट्र धर्म आंदोलन ’


दीपक पवार एक अभ्यासू, प्रचंड तळमळ असलेला, लॉजिकल पद्धतीने निडरपणे मुद्दे मांडणारा, ……, असा एक गुणी प्राध्यापक. त्यांना खूप वर्षापासून जवळून ओळखतो.
गुढीपाडव्यानिमित्त होणार असलेल्या उपक्रमास माझा व्यक्तिशः पाठिंबा आहे. तरीपण या मराठी भाषेवर उभ्या राहिलेल्या चळवळीची चिकित्सा करणे मला महत्त्वाचे वाटते.
या चळवळीतून महाराष्ट्र धर्माचे हित साध्य होईल असा सर्व समावेशक दृष्टिकोन
(Holistic approach) घेतलेला आहे की…..?
*चीन देशाच्या प्रगतीमध्ये चिनी भाषेने मोठी मदत केली. 2009 साली मी चीनमध्ये जागतिक परिषदेत भाग घेण्यासाठी सरकारचा पाहुणा म्हणून गेलो होतो. आश्चर्य म्हणजे पंधरा दिवसांमध्ये एकही माणूस इंग्रजीमध्ये बोलला नाही. आम्हाला दुभाषा दिलेला होता. सगळा व्यवहार चिनी भाषेत चालू होता. एका डिनरला बियरचा डोस जास्त झाल्यावर एक चिनी अधिकारी माझ्याशी फाड फाड इंग्रजी मध्ये बोलू लागला. त्याचे सगळे शिक्षण अमेरिकेत झाले होते!
* मराठीचा आग्रह धरत असता मराठी ज्ञान, व्यवहार, अर्थकारण याबाबत भाषेचा दर्जा काय? चिनी भाषा मॅरेथॉन शर्यतीत भाग घेण्यास सक्षम असेल तर मराठी भाषा ही अजून रांगत आहे!
* मराठी भाषा आणि संस्कृतीच्या आधाराने अर्थकारण, समाजकारण, राजकारण यांचा समग्र वेध म्हणजे मराठी कारण असं सांगितलं जात आहे. यात मराठी धर्मकारण हा विषय दिसत नाही. खरे तर या धर्मकारणाने इथले अर्थकारण, समाजकारण, राजकारण यांचा पायाच उखडून, नासवून टाकला आहे त्याच्याबद्दल काय?
* भाषा म्हणून मराठीची आज अशी काय क्षमता आहे? बनगरवाडी सोडल्यास एकही वास्तव मराठी जीवन दाखवणारे पुस्तक नाही.
* शंभर टक्के मराठी बोलणारी गाव जातीच्या नावाखाली एकमेकांचा गळा घोटायला निघालेली दिसतात.
* मराठी बोलणारे शिवसेनेचे दोघे चुलत भाऊ यांनी वेगळी चूल केली तर मराठीचा डंका पिटवत अनेक जण गद्दार झाले. गुजरातीचा गोडवा गाऊ लागलेत.
* राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे अचानक टोळी करून ब्राह्मणी सनातन धर्म बनविणाऱ्याच्या पालखीचे भोई बनले. मराठी भाषेच्या विटेवर उभ्या राहिलेल्या आमच्या विठुरायाला, वारकरी धर्माला विसरले.
* मराठी भाषा बोलतच राज्यघटना खोदून, कुरतडून टाकली. त्यामुळे निव्वळ भाषेत आणि संस्कृतीत ताकद दिसत नाही ती ताकद आहे स्वतःचे श्रेष्ठत्व कायम राखण्यासाठी सुरू केलेल्या धर्मकारणा मध्ये.
* धर्माची चिकित्सा न करता आंदोलन स्वीकारले तर आजच प्रत्येक मराठी कुटुंबात 70 ते 80 टक्के मनुस्मृती प्रमाणे आचरण होते. मग ते सर्व स्वीकारून काय प्रगती होणार ?
*सर्वधर्म, जाती, पथ हे एका छत्राखाली एकत्र आणणे हे खरे तर आरएसएस च्या “समरसता” या सूत्राला बळकटी देण्यासारखे आहे. म्हणजे समूहामध्ये आपण मराठी ही एकच भाषा बोलू पण आपली उच्चनीचतेची, शोषणाची उतरंड कायम ठेवू!
* मराठी भाषा समृद्ध करून मराठी भाषिकांचे जीवनमान सुधारणार नाही. सगळा देश एक भाषा बोलतो म्हणून चीन महासत्ता झालेला नाही. चीनमध्ये नोबेल पारितोषिक विजेते फार कमी आहेत त्यांनी इंग्रजी मध्ये झालेले संशोधन आपलेसे केले. चिनी भाषेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची सर्जनशीलता, कार्यक्षमता प्रभावीपणा वाढविला.नाविन्यपूर्ण प्रयोग शोधण्याची क्षमता सुधारण्याचे असंख्य मार्ग वापरले.
* मराठी भाषा मधील लेखक हे बहुतेक स्वतःला ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मलो असे मानणारे आहेत. मराठी भाषेतील विचार आणि संस्कृती ही ब्राह्मणी श्रेष्ठत्व कुरवळणारी आहे आणि इतर बहुजनांना दुय्यम लेखणारी आहे आणि ते कमकुवतच राहावेत अशी रचना केलेली आहे. जो वेगळे लिहील त्याला अनुलेखाने मारले जाते.
* महाराष्ट्र देशाला दिशा देणारे असंख्य आद्य लेखक मराठी मध्ये होऊन गेले. असे असताना देखील कुसुमाग्रज नावाच्या साहित्यिकाच्या जन्मदिनावरून मराठी दिवस सुरू करण्यात आलेला आहे. त्यांनी एका कवितेत ज्योतिबांच्या विचारावर कोळिष्टके चढलेली आहेत आणि गांधीजींच्या पुतळ्यावर जवळ चपलांचे दुकान असावे अशा कविता (कवितासंग्रह: प्रवासी पक्षी, इतर)लिहिलेल्या आहेत. त्यातून मराठी धर्माला काय स्फूर्ती मिळणार?
* कमकुवत मराठी भाषा ही महाराष्ट्र धर्माच्या मागासनेपणाचे कारण नाही. इथली ब्राह्मण व्यवस्था हे आपल्या मागासलेपणाचे आणि अधोगतीचे कारण आहे .
* उपाय? राज्यघटनेच्या चौकटीतून वेगळे प्रशासकीय/ राजकीय…. मॉडेल उभे केले पाहिजे.
* या चळवळीतून महाराष्ट्र धर्माचे हित साध्य होईल असा सर्व समावेशक दृष्टिकोन
(Holistic approach) घेतलेला दिसत नाही. मूळ प्रश्नाकडे तुकड्या तुकड्याने पाहण्याचा दृष्टिकोन (segmentalistic approach )घेतलेला आहे. पुरोगामी चळवळींची थोड्याफार फरकाने अशीच अवस्था झाली आहे. अशा आंदोलनातून आमची अवस्था पाच आंधळे आणि हत्ती सारखी तर झाली नाही ना?
तसं असेल तर त्यातून बाहेर पडूया! सर्वांगीण विकासाचा मार्ग शोधूया!
– सुरेश खोपडे

(क्षमस्व. एवढ्या तळमळीने उभे केलेल्या आंदोलनाबद्दल असं निगेटिव्ह लिहायला अजिबात आवडले नाही . तरीपण दीपक पवार हे तर पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक आहेत. पॉलिटिकल सिस्टमचे महत्त्व त्यांना सांगण्याची गरज नाही. बहुजन हित राखण्यासाठी आयोजित केलेल्या दोन-तीन बैठकांना मी त्यांना निमंत्रित केले होते पण ते जमले नाही. भविष्यात एकत्र बसून चर्चा करून एक मोठे आंदोलन नक्कीच उभारता येईल असा आशावाद आहे.)


Post Views: 16






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *