नांदेडमध्ये पोलिस अंमलदार निलंबित – VastavNEWSLive.com


पोलीस भरतीत पैशांची मागणी करत होता 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा सध्या सुरू असताना एका गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मदत करून देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप समोर आल्यानंतर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालय विभागात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार नागनाथ माधव नागरगोजे (बक्कल क्रमांक 2163) हे पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांशी संपर्क साधून लेखी परीक्षेत मदत करून देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी करत असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली. विशेष म्हणजे तीन उमेदवारांकडून पैसे मागितल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. यासंदर्भात मोबाईलद्वारे पैशांची मागणी होत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची शहानिशा केली. आरोपांची प्राथमिक पुष्टी झाल्यानंतर संबंधित पोलिस अंमलदारावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्यात आली.

नांदेड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पोलिस अंमलदार नागनाथ माधव नागरगोजे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम २५ तसेच मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम १९५६ मधील नियम ३ अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून दोषी आढळल्यास संबंधितावर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


Post Views: 1,412






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *