![]()
विद्युत वितरण कंपनीच्या अचलपूर विभागीय आणि नांदगाव खंडेश्वर येथील उपविभागीय कार्यालयात ‘लाईनमन दिन’ साजरा करण्यात आला. महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या जनमित्र अर्थात लाईनमनचे जनतेपर्यंत अखंडित वीजपुरवठा पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान असते. त्यांच्या या कार्याची दखल घेत उपविभागातील अनेक लाईनमनचा यावेळी सत्कार करण्यात आला, ज्यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. अचलपूर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे होते. त्यांनी लाईनमन दिनाचे महत्त्व विशद केले आणि यावर्षीच्या संकल्पनेनुसार ‘सेवा, सुरक्षा व स्वाभिमान’ यावर भर देत तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करत ग्राहकांसाठी सेवाधर्म निभावण्याचे आवाहन केले. यावेळी उपकार्यकारी अभियंते उमेश राठोड, नीलेश बोरीकर, संजय दातीर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन नीलेश मानकर यांनी केले, तर आभार नीलिमा गावंडे यांनी मानले. राजेश तिवारी, वंदना भलावी, विशाल पसारकर, मयूर वसू यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि विद्युत साहित्य पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा शपथेचे वाचन केले. महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे शुभेच्छा संदेश वाचण्यात आले. कार्यक्रम दरम्यान ‘विद्युत सुरक्षा’ या विषयावर राजेश पाटील (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, प्रशिक्षण केंद्र अमरावती) यांचे, तर ‘गोष्ट पैशा-पाण्याची’ अंतर्गत आर्थिक व्यवस्थापनावर एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक अजयसिंग राजपुरोहित यांचे सखोल मार्गदर्शन झाले. नांदगाव खंडेश्वर येथील जनमित्रांच्या सत्कार सोहळ्याला पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “आपण सर्वजण जनसेवक आहोत आणि जनतेची सेवा करण्यासाठीच आहोत,” असे सांगत लाईनमनच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्याम येनगंटीवार, सहाय्यक अभियंता हरिष अंबाडकर, इतर अभियंते हरिष महल्ले, प्रसाद कुटेमाटे, शुभम बंड, गौरव कारमोरे तसेच नांदगाव खंडेश्वर विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागातील सर्व जनमित्र व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्यांचा ताण हलका व्हावा याकरिता ‘सेवा आमची, खेळ आमचा’ अंतर्गत टर्फ क्रिकेट सामन्यांचे तसेच विविध मनोरंजन व सांगितिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
महावितरणच्या लाईनमनचा अचलपूर, नांदगावात गौरव:अखंडित वीजपुरवठा करणाऱ्या 'जनमित्रांचा' सत्कार, 'लाईनमन दिन' साजरा
