राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल:फॉर्म भरताना आदित्य ठाकरे मात्र अनुपस्थित; नाराजीच्या चर्चांवर सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण




राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एकमेव जागेसाठी अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी भास्कर जाधव, सतेज पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अनुपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वस्तुतः या जागेवर शिवसेनेचा दावा असावा आणि ही जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे सुरुवातीपासून आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादीने शरद पवारांचे नाव पुढे केल्यानंतर आणि काँग्रेसने त्याला तातडीने पाठिंबा दिल्याने ही जागा पवारांकडे गेली. आदित्य ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे ते या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून, याच नाराजीतून त्यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याची कुजबूज सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी समोर येत स्पष्टीकरण दिले असून आदित्य ठाकरे यांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन अहिर म्हणाले, आदित्य ठाकरे हे या जागेबद्दल बोलले होते हे नाकारता येत नाही. मात्र निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे उद्धव ठाकरेंना भेटले आणि चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेतला असेल. आदित्य ठाकरे हे आले नसले तरी शरद पवार यांचा अर्ज भरताना आमचे नेते भास्कर जाधव, अनिल परब आणि आपण स्वतः उपस्थित होतो. काल पत्रकार परिषद झाली तेव्हा आम्ही उपस्थित राहायचे असे काही ठरले नव्हते. त्यामुळे त्या दोन पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. पण आमचा पाठिंबा त्यांना असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यामुळेच ते पवारांचा अर्ज भरताना उपस्थित राहू शकले नाहीत, असेही सचिन अहिर यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी घरूनच उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *