![]()
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (SBL Energy Limited) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाचे पडसाद आता राजकीय स्तरावर उमटू लागले आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा १८ वर पोहोचला असून, काटोलचे भाजप आमदार चरणसिंह ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मृतांच्या वारसांना ७५ लाख रुपयांची, तर जखमींना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ देणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी भयंकर स्फोट झाला. त्यात १९ कामगार ठार झाले आहेत. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना २ लाख, तर राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. मात्र, मृतांच्या वारसांना ७५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार चरणसिंह ठाकूर यांनी केली आहे. नेमके काय म्हणाले चरणसिंह ठाकूर? कळमेश्वर पोलिसांनी या प्रकरणी कंपनीच्या मालकासह २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आमदार ठाकूर यांनी यावर असमाधान व्यक्त केले आहे. नागपूर स्फोट प्रकरणात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अशी मागणी चरणसिंह ठाकूर यांनी केली. एसबीएल एनर्जीच्या प्लांटमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत. या सगळ्याची गंभीर दाखल घेतली पाहिजे. स्फोटक कंपनीत मजुरांना योग्य प्रशिक्षण दिल्याशिवाय कामावर लावू नये. राज्य सरकारचे अधिकारी, केंद्र सरकारच्या एजन्सीकडे बोट दाखवतात, त्यामुळे हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचेही ते म्हणाले. …अंत्यसंस्कार होऊ देणार नाही या घटनेतील मृतांना 75 लाख रुपये नुकसान भरपाई दिल्याशिवाय, तर जखमींना 25 लाखाचा मदत मंजूर झाल्याशिवाय आम्ही मानणार नाही, अशी मागणी चरणसिंह ठाकूर यांनी केली. जोवर मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळत नाही, तोवर मृतकांचे अंत्यसंस्कार करू देणार नाही, असा इशाराही चरणसिंग ठाकूर यांनी दिला. अधिकारी जबाबदारी टाळत आहेत राज्यसरकारने SOP जाहिर करावी, त्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नाही. SBL एनर्जी कारखाना बंद ठेवला पाहिजे. राज्य सरकारचे आणि केंद्राचे अधिकारी एकमेकांवर ढकलत जबाबदारी टाळत आहे. SOP तयार करून निरीक्षक ठेवले पाहिजे, असेही ठाकूर म्हणालेत. हे ही वाचा… नागपूर एसबीएल स्फोट प्रकरण:मृतांचा आकडा 18 वर, मालकासह 21 अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा; आतापर्यंत 9 जणांना बेड्या नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. सविस्तर वाचा…
मृतांच्या वारसांना 75 लाखांची मदत द्यावी:अन्यथा मृतदेहांचे अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, नागपूर स्फोट प्रकरणी भाजप आमदार आक्रमक
