कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेने साेसला काॅर्पाेरेट जिहाद:आपबिती सांगताना पीडितेला अश्रू अनावर; आयोगाच्या सदस्यांचेही डोळे पाणावले
![]()
“मॅम, घरी वडील कॅन्सरने अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांच्या उपचारांसाठी पैसे हवेत म्हणून मी तो सगळा अपमान आणि नरकयातना मुकाट्याने सोसत राहिले…” हे सांगताना त्या कोवळ्या मुलीला हुंदके अनावर झाले. नाशिकमधील बहुचर्चित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील पीडित तरुणींची ही भीषण आणि आतड्याला पीळ पाडणारी कहाणी ऐकून समोर बसलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. रविवारी महिला आयोगाच्या सत्यशोधन समितीने शहरातीलच एका महाविद्यालयात या पीडित मुलींशी तब्बल तीन तास संवाद साधला. ही केवळ एका गुन्ह्याची नोंद नव्हती, तर गरिबी आणि हतबलतेचा निर्दयीपणे गैरफायदा घेणाऱ्या एका विकृत षड््यंत्राची ती काळीकुट्ट कहाणी होती. टीसीएस कॅम्पसमध्ये दीड तास केली सखोल चौकशी पीडितांचा हा आक्रोश ऐकून सुन्न झालेल्या आयोगाच्या विशेष समितीने थेट ‘टीसीएस’ कंपनीच्या कॅम्पसमध्ये धडक दिली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, माजी पोलिस महासंचालक बी. के. सिन्हा आणि ज्येष्ठ वकील मोनिका अरोरा यांच्या या सत्यशोधन समितीने तिथे तब्बल दीड तास कसून चौकशी केली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले गोपनीय स्टिंग ऑपरेशन आणि एसआयटीप्रमुख संदीप मिटके यांनी केलेल्या तपासाबद्दल आयोगाने समाधान व्यक्त केले. अर्धांगवायूने वडील अंथरुणाला खिळले होते दुसऱ्या एका मुलीचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले आहेत. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिच्याच खांद्यावर. घरात कधी अन्नाचा कण नसायचा. अशा वेळी स्वाभिमानापेक्षा पोटाची भूक मोठी ठरली. कॉर्पोरेट क्षेत्रातील काही लांडग्यांनी याचाच लाभ उचलला. नोकरीच्या नावाखाली तिला धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पाडले गेले. आरोपींच्या मुसक्या आवळणार… या लेकींना छळणाऱ्या मुख्य सूत्रधारांपैकी फरार ‘प्रोग्राम असोसिएट’ निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे, तर शुक्रवारपासून एटीएस आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रझा मेमन आणि शफी शेख यांची कोठडी संपत असल्याने त्यांनाही आज न्यायालयात हजर केले जाईल. आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या या लेकींचे अश्रू आता केवळ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे या नराधमांवर आता मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडिलांच्या केमोथेरपीसाठी औषधांची गरज होती एका पीडितेचे वडील कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात मृत्यूशी झुंजत आहेत. वडिलांच्या केमोथेरपीसाठी आणि महागड्या औषधांसाठी पैशांची नितांत गरज होती. केवळ याच कारणामुळे ती मुलगी तिथे होणारा सर्व मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली. कॉर्पोरेट कंपनीतील वरिष्ठांनी होत असलेल्या अत्याचाराची दखल घेतली नाही.
