रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप:म्हणाले – महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारचा मतदारसंघ फोडण्याचा प्रयत्न
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून, मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) करून स्वतःच्या फायद्यासाठी खासदार वाढवण्याचा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, “२०२३ मध्ये जे विधेयक पास झाले, ते सिद्ध करते की भाजपला आपल्या सोयीनुसार मतदारसंघ तोडायचे आहेत. पिंपरीच्या वॉर्ड २४ मध्ये ज्याप्रमाणे एससी वॉर्ड जनरल करण्यात आला, तो भाजपच्या ‘सोयीचे पिच’ तयार करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. या प्रक्रियेत २०११ ची जनगणना का ग्राह्य धरली नाही? २००१ ची लोकसंख्या का विचारात घेतली जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये खासदारांची संख्या वाढत असताना दक्षिण भारतातील केरळ, तेलंगणा सारख्या राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होणे हे लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘४०० पार’चा नारा घटना बदलण्यासाठी? भाजपला ‘४०० पार’ जागा हव्या आहेत कारण त्यांना देशाची घटना बदलायची आहे, असा खळबळजनक आरोप पवारांनी केला. भाजपची विचारधारा ‘मनुवादी’ असून महिलांच्या बाबतीत राम कदम, संभाजी भिडे आणि कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०२९ ची निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच रणनीती आखली जात असून मुख्यमंत्र्यांना ‘टूलकीट’ देऊन प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावणे हे घटनेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.
अजित पवारांच्या अपघाताची चौकशी आणि बारामती दौरा अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “सरकार या तपासाबाबत गंभीर नाही, केवळ शब्दांचा खेळ सुरू आहे. हा तपास सीबीआयकडे देण्याची आमची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.” आज मुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर असताना, त्यांनी इतर गोष्टींवर बोलण्यापेक्षा या तपासाचे काय झाले आणि सीबीआय चौकशीची स्थिती काय आहे, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पुणे रिंग रोडला अजितदादांचे नाव देण्याची मागणीही त्यांनी पुन्हा लावून धरली.
कौटुंबिक संबंध आणि राजकीय भूमिका सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या व्यासपीठावर केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, ते कौटुंबिक प्रेम आहे. पार्थ पवार यांच्याशी आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी भविष्यात त्यांना गरज पडल्यास आम्ही नक्कीच मदत करू. २३ एप्रिलनंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. टीसीएस कंपनी प्रकरणात झालेल्या गैरप्रकारांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
