राज्यसभा निश्चित, पण लोकसभा लढवण्याची इच्छा!:केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे विधान, सातही जागा जिंकण्याचा केला दावा




“मला राज्यसभेवर पुन्हा संधी मिळणार हे निश्चित आहे, मात्र तरीही लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी वैयक्तिक इच्छा कायम आहे,” असे स्पष्ट आणि सूचक वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. परभणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस उरले असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सात जागांपैकी भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. यामध्ये रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय विनोद तावडे यांचेही नाव चर्चेत आहे. राज्यसभा उमेदवारी निश्चित असूनही आठवले यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. नेमके काय म्हणाले रामदास आठवले? राज्यात आगामी १६ मार्च रोजी राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. मी राज्यसभेवर जाणार हे मला आधीच माहीत आहे, मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा असल्याचे रामदास आठवले म्हणाले. या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ पाहता सहा उमेदवार सहज निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करतानाच, महाविकास आघाडीत काही बिघाड झाला, तर आम्ही सातवी जागाही खेचून आणू, असा दावा रामदास आठवलेंनी केला. रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांना आवाहन राज्यातील विखुरलेल्या रिपब्लिकन शक्तीला एकत्र आणण्याबाबत आठवले यांनी मोठे विधान केले. रिपब्लिकन पार्टीच्या सर्व गटांनी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. या एकत्रीकरणाचे नेतृत्व जर प्रकाश आंबेडकर यांनी केले, तर त्याचा समाजाला मोठा फायदा होईल. यामुळे दलित समाजाची राजकीय ताकद वाढेल आणि योग्य प्रतिनिधित्व मिळेल, असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश गरिबीमुक्त होईल रामदास आठवले यांनी यावेळी केंद्र सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली. सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरिबी दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असून, लवकरच भारत गरिबीमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *