नांदेड(जिमाका) – आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे विकार टाळण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन आहारात प्रमाणित आयोडीनयुक्त मिठाचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 14 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध दिन’ म्हणून पाळला जातो.
शरीराच्या आणि मेंदूच्या विकासासाठी आयोडीन आवश्यक
पंधरवड्यात विविध जनजागृतीपर उपक्रम
या पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, घोषवाक्य लेखन, प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरे, उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नागरिकांना आयोडीनचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावोगावी गटसभा व जनजागृती सभा घेण्यात येत आहेत. तसेच मीठ तपासणी संचाच्या साहाय्याने मिठातील आयोडीनचे प्रमाण तपासण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि समाजमाध्यमांद्वारेही या विषयाचा प्रसार करण्यात येत आहे.
मिठाची खरेदी आणि साठवणूक करताना काळजी घ्या
नागरिकांनी नेहमी प्रमाणित, पाकीटबंद आयोडीनयुक्त मीठ खरेदी करावे आणि उघड्यावर विकले जाणारे अस्वच्छ मीठ वापरणे टाळावे. मिठातील आयोडीनचे प्रमाण टिकून राहण्यासाठी मीठ ओलाव्यापासून दूर, हवाबंद आणि झाकण असलेल्या डब्यात साठवावे. आहारात नियमितपणे आयोडीनयुक्त मिठाचा वापर करून स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य जपावे. या पंधरवड्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad