नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लेखणीतून हे गीत साकारले आहे. संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला मानवतावादी विचारांची जोड देणाऱ्या या गीताला संगीताच्या माध्यमातून भावपूर्ण अभिव्यक्ती लाभली आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी गीताला संगीत दिले असून, विनल देशमुख आणि शेफाली कुलकर्णी यांनी आपल्या स्वरांनी त्यातील भावविश्व खुलवले आहे. शब्द, स्वर आणि संगीत यांचा सुंदर संगम साधणारे हे गीत म्हणजे संस्थेच्या विचारधारेचे सुरेल प्रतिबिंब ठरले आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स कॉलेज, नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात या संस्थागीताचे लोकार्पण नुकतेच झाले. सुप्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काबदे, सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल अग्रवाल, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे आणि पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मानवतेची ध्वजा उभारूनी या शब्दांत केवळ एका संस्थेची ओळख सामावलेली नाही, तर माणसाने माणसाशी कसे वागावे, समाजाप्रती आपली जबाबदारी कशी ओळखावी आणि देशप्रेमाचा अर्थ केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो कृतीतून कसा व्यक्त करावा, याचाही विचार सामावलेला आहे. मानवतेची ध्वजा उभारणे म्हणजे भेदांच्या भिंती ओलांडून माणुसकीचा स्वीकार करणे. प्रेमाचा स्वीकार करणे म्हणजे परस्परांबद्दल आदर, सहिष्णुता आणि आपुलकीची भावना जोपासणे. या मूल्यांचा जागर गीताच्या शब्दांतून घडतो.

Post Views: 2
