काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार




काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. सपकाळ यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे घाटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. धीरज घाटे यांनी शनिवारी सायंकाळी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली. पुण्यात पतित पावन संघटनेने रविवारी सकाळी काँग्रेस भवनसमोर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या प्रकरणी बोलताना धीरज घाटे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदूविरोधी टिपू सुलतान याच्याशी तुलना करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पुणे शहर भाजपा या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहे. यावेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष दृष्यत मोहोळ, नगरसेविका स्मिताताई वस्ते, नगरसेवक राघवेंद्र बापू मानकर, महेश वाबळे, अमर आवळे, नगरसेविका सई थोपटे, माजी सरचिटणीस गणेश घोष, विशाल पवार आणि योगेश जावीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks