दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला अडथळे कोण घालतंय?:अजित पवारांच्या सासुरवाडीतून वरिष्ठांकडे सूचक बाण; सांत्वनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा तापल्या

0
730-x-548-2025-10-14t105133033_1770352775.jpg




दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याची प्रक्रिया अजित पवार यांच्या पुढाकारातून सुरू होती, असा ठाम दावा खासदार नीलेश लंके यांनी केला आहे. मात्र काही नेत्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत असुरक्षितता वाटत असल्यानेच विलीनीकरणाच्या वाटचालीत अडथळे निर्माण होत आहेत, अशी टीका त्यांनी नाव न घेता केली. त्यांचा रोख कोणाकडे आहे, हे राजकीय वर्तुळात लपून राहिलेलं नाही, अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीत या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केल्या जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झालेल्या सभेत लंके बोलत होते. अजित पवारांची सासरवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात त्यांनी शेवटची प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी सांगितलं की, जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांसाठी जयंत पाटील आणि त्यांनी स्वतः प्रचार केला. हे सर्व वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चांनंतरच ठरलं होतं, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने प्रत्यक्ष पावलं टाकली जात होती, असा त्यांचा सूर होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये उमेदवारांना ‘चॉईस’ने चिन्ह देण्यात आलं, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. या निर्णयामागे दोन्ही गटांमध्ये झालेल्या समन्वयाची पार्श्वभूमी असल्याचं त्यांनी सूचित केलं. मात्र अजित पवार आता नसल्याने त्याच निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं. काही नेते आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल, या भीतीनेच विलीनीकरणाबाबत वेगवेगळे डावपेच रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. तेर येथे राष्ट्रवादी नेत्या सक्षणा सलगर यांच्या प्रचारासाठी आलेल्या लंके यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केलं. त्यांच्या वक्तव्यातून अजित पवारांच्या पुढाकारामुळे सुरू झालेली राजकीय प्रक्रिया सध्या अडथळ्यांत अडकली असल्याचं चित्र समोर आलं. अजित पवार गटातील काही नेते विलीनीकरणाच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेत आहेत, मात्र काही जण अप्रत्यक्ष विरोध करत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे सध्या पक्षांतर्गत वातावरणात संभ्रम आणि कुजबुज वाढल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीसाठी आज शेवटचा दिवस असल्याने बारामतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यभरातून कार्यकर्ते, नागरिक आणि विविध पक्षांचे नेते पवार कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बारामतीत येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि इतर कुटुंबीय लोकांची भेट घेत आहेत. आज अखेरचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सहयोग सोसायटीतील सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असून, या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा देखील रंग घेत आहेत. सांत्वनाच्या वातावरणातही दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबतचे संकेत आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत सुरू असलेल्या या चर्चांमुळे आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लंके यांच्या वक्तव्यामुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर पडलेलं सावट आणि त्यामागची राजकीय कारणं याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत या मुद्द्यावर अधिक स्पष्टता येते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed