उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पहिलाच धक्का:राष्ट्रवादीत मोठ्या नेत्याकडून राजीनामा बॉम्ब; विधान परिषद डावलल्याची नाराजी

0
730-x-548-new-2026-05-14t165009752_1778758602.jpg




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे प्रमुख नेते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आनंद परांजपे हे पक्षात सरचिटणीस, प्रवक्ते तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून यासंदर्भातील पत्र उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पाठवण्यात आले आहे. राजीनामा पत्रात आनंद परांजपे यांनी पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षांत पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून विविध जबाबदाऱ्या दिल्या, त्याबद्दल मी ऋणी असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आता हा प्रवास थांबवत नव्या राजकीय वाटेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझा 14 वर्षांचा प्रवास कायम स्मरणात राहील. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम मी विसरणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम दरम्यान, आनंद परांजपे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. विधान परिषदेसाठी संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षातील काही महत्त्वाच्या नियुक्त्या आणि बदलांमुळेही ते अस्वस्थ होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे केवळ वैयक्तिक कारण नसून पक्षातील अंतर्गत नाराजीही कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या निर्णयामुळे ठाणे आणि पालघर परिसरातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा धक्का आनंद परांजपे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी अद्याप पुढचा राजकीय निर्णय जाहीर केलेला नसला, तरी नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे, या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा धक्का मानला जात आहे. पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेते आणि आनंद परांजपे पुढे कोणता निर्णय घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed