माहूरगडावरील नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; 120 एसटी बसेस, 2 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात
भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; आरोग्य, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज व्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
नांदेड : माहूरगडावर दि. 11 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणी व वीज यांसह सर्व आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कुचराई होऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित विभागांना दिले.
माहूर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहधर्मादाय आयुक्त तथा संस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा हिराबाई शेळके आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
120 एसटी बसेसची व्यवस्था
नवरात्रोत्सवादरम्यान माहूरगडावर येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 120 बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
500 हून अधिक पोलीस व होमगार्ड तैनात
भाविकांच्या सुरक्षेसाठी 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. जंगल परिसरात वन्यप्राण्यांपासून भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वन विभागाची गस्तही वाढविण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधांसाठी विशेष व्यवस्था
भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत ग्रामीण रुग्णालयातील 40 पैकी 20 खाटा यात्रा व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुरेसा औषधसाठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असून, दत्तशिखर, अनुसया माता आणि रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी आरोग्य पथके व रुग्णवाहिका तैनात राहणार आहेत.
रस्ते, पथदिवे आणि वीजपुरवठ्यावर भर
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून बंद असलेले पथदिवे नवरात्रोत्सवापूर्वी सुरू करण्यात येणार आहेत. तसेच महावितरणकडून उत्सव काळात अखंडित वीजपुरवठा करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.
पाणी, स्वच्छता व महाप्रसादाची सुविधा
संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि सुलभ दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात येणार आहे. परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद, साबुदाणा खिचडी आणि फळांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
नगरपंचायतीतर्फे दत्त चौक येथे नियंत्रण कक्ष, पाणी, पथदिवे आणि शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दत्तशिखर संस्थानतर्फेही पाणी, स्वच्छता, वीज, महाप्रसाद तसेच संस्थानच्या जागेत मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या आरोग्य, सुरक्षा, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांसाठी विविध विभागांचे दोन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
दरम्यान, आढावा बैठकीस पुरातत्त्व विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुखांची अनुपस्थिती असल्याची गंभीर नोंद जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतली.
प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाचा अनुभव देण्याचे नियोजन केले आहे.
भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे व शिस्तीचे पालन करून निर्धास्तपणे माहूरगडावर यावे आणि श्री रेणुकामातेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासन व संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
