विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होते:आमदार अमोल मिटकरी यांचा दावा; स्थानिक सरपंचाने दिलेल्या माहितीचा दिला दाखला




सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना त्यात मोठा स्फोट झाला, असे ते म्हणालेत. विमान अपघातात प्रथम 6 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली. पण घटनास्थळी पाचच मृतदेह सापडले. मग 6 वा व्यक्ती कोण? असा पुनरुच्चारही त्यांनी या प्रकरणी केला आहे. अजित पवार यांचे गत बुधवारी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या धक्क्यातून अद्याप सावरले नाहीत. आमदार अमोल मिटकरी यांचाही यात समावेश आहे. त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघातावर एक नवा दावा केला. ते म्हणाले, अजित पवारांचा मृत्यू झाला त्या दिवशी मी सायंकाळी 5 वाजता घटनास्थळी गेलो होतो. तेव्हा तेथील सरपंचाने मला धक्कादायक माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही विमानाच्या दिशेने जात असताना अचानक स्फोट झाला हे मला त्यांनी सांगितले. सदर विमान अपघातात पहिल्यांदा 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. याचा अर्थ विमानात 6 जण होते. मग पाचच जणांचे मृतदेह कसे आढळले? तो सहावा व्यक्ती कुठे गेला? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी यावेळी केली. गोजुबावीच्या सरपंचाचा दावा काय? उल्लेखनीय बाब म्हणेज गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी अजित पवारांच्या विमानाचा अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अपघातावेळी विमानाचा दरवाजा उघडा होता. एक निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती बाहेर येतोय असे आधी वाटले, पण नंतर तसे काही दिसले नाही. हे विमान अजितदादांचे होते याची कल्पना आम्हाला नव्हती. ते एखाद्या उद्योगपतीचे असेल असे आम्हाला वाटले, असे त्यांनी अपघातानंतर सांगितले होते. सरपंच कल्याण आटोळे यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही ही माहिती दिली. विमानाने कोसळण्यापूर्वी आकाशात 2 घिरट्या घातल्या. त्यानंतर खाली येत असताना हा अपघात झाला, असेही ते म्हणालेत. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *