इ-केवायसीमुळे अडकलेल्या महिलांना दिलासा:तीन महिन्यांचा निधी आता एकत्रित मिळणार

0
e2c05cf7-45d7-4162-8cd3-1a41da7df50b_1770221366048.jpg




ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती सादर केल्यामुळे मानधनापासून वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. यामुळे अनेक महिलांना एकत्रित निधी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत जिल्ह्यातील सुमारे ७ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यांना गेल्या काही महिन्यांपासून नियमितपणे पैसे मिळत होते. मात्र, शासनाने ई-केवायसीची अट घातल्यानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली होती. बहुसंख्य महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली, परंतु काही महिलांकडून चुकीची माहिती भरली गेल्याने त्या अपात्र ठरल्या. यामुळे त्यांना नोव्हेंबरपासून रक्कम मिळाली नव्हती. या पार्श्वभूमीवर, शासनाने चूक दुरुस्त करण्याची संधी दिली आहे. ज्या महिलांनी दुरुस्ती करून स्वतःला पुन्हा पात्र करून घेतले आहे, त्यांना आता तीन महिन्यांची एकत्रित रक्कम दिली जाईल. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट जमा केली जाते, ज्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागतो. मदत अचानक बंद झाल्याने अनेक महिलांनी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांमध्ये चौकशीसाठी गर्दी केली होती. ई-केवायसी करताना संबंधित महिलांना वडील किंवा पतीच्या आधारकार्डची प्रत जोडण्यास सांगितले होते. परंतु, ज्या महिला विधवा आहेत, त्यांना पतीचे आधारकार्ड जोडणे शक्य नव्हते. तसेच, ज्या अविवाहित महिलांचे वडील हयात नाहीत, त्यांना वडिलांचे आधारकार्ड जोडता आले नाही. यामुळे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. अशा महिलांना आता स्वयंघोषणापत्राच्या आधारे पुन्हा संधी देण्यात आली आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाही पूर्ववत लाभ दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed