विमानात तांत्रिक बिघाड नव्हता, चूक पायलटचीच!:VSR एव्हिएशनच्या मालकाचा अजब दावा; अजित पवारांच्या विमान अपघातावरून तर्क-वितर्क


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असतानाच, अपघातग्रस्त विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा करत आपली जबाबदारी झटकली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी या भीषण दुर्घटनेचे खापर थेट वैमानिकांवर फोडल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमान अपघात संदर्भात माहिती देताना व्हीएसआर एव्हिएशनचे मालक व्ही. के.सिंग म्हणाले, आमच्या माहितीप्रमाणे सदर विमान हे अत्यंत चांगल्या स्थितीत होते. याप्रकरणी आता डीजीसीएकडून चौकशी करण्यात येत आहे. कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानात ना तुम्ही होता ना मी होतो. हे विमान कुठे लँड करायचा, हा पायलटचा निर्णय होता, असे म्हणत सिंग यांनी पायलट यांच्यावर रोख धरला आहे. तसेच पायलटने आधी विमान धावपट्टी 29 वर उतरवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर धावपट्टी 11 वर उतरवण्याचा प्रयत्न केला, असे समजतेय. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पायलटला रनवे दिसला नाही आणि त्यातून ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळाली आहे, त्याआधारे मी हे सांगत असल्याचे व्ही. के.सिंग म्हणाले. पुढे बोलताना व्ही. के.सिंग म्हणाले, खरेतर मृत पायलट सुमित कपूर हे अत्यंत अनुभवी होते. त्यांच्याकडे 16000 तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता आणि सहवैमानिक कॅप्टन शांभवी या देखील प्रचंड अनुभवी होत्या. अपघातग्रस्त विमानाची वेळोवेळी देखभाल केली जात होती आणि ते जगभरात वापरले जाणारे एक विश्वासार्ह मॉडेल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *