सोलापूर-धुळे मार्गावर 2 तास आंदोलन:सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याने गुन्हे दाखलची मागणी‎



सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपूलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ३२ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून १२ वाजेपर्यंत २ तास रस्ता रोको आंदोलन केले.कन्नड शहरात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील, अंधानेरचे सरपंच अशोक दापके, नवनाथ राठोड, वर्षा लहाने यांच्यासह सुमारे दीडशे नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांना तातडीने चर्चेसाठी पाचारण केले आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. अग्निहोत्री यांनी लगेचच आपल्या कार्यालयात रस्ता सुरक्षा व अपघातांचा सविस्तर आढावा घेतला. गुन्हे दाखल करावेत बांधकाम सुरू असताना ५०० मीटर अंतरावरून लाईट्स, रेडियमचे फलक असणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदार व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हे नियम पायदळी तुडवले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *